दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर आव्हान
By admin | Published: February 15, 2017 12:35 AM2017-02-15T00:35:42+5:302017-02-15T00:35:42+5:30
आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या सुपरसिक्स गटातील पहिल्या सामन्यात भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुध्द
कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या सुपरसिक्स गटातील पहिल्या सामन्यात भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुध्द भिडेल. त्याचप्रमाणे सुपरसिक्स गटातील पहिल्या दिवसाच्या अन्य लढतीत पाकिस्तान - श्रीलंका आणि बांगलादेश - आयर्लंड असे सामने रंगतील.
विशेष म्हणजे, गटातील सर्वच संघ अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यास उत्सुक असल्याने यावेळी अटीतटीची लढत पाहण्यास मिळेल. या स्पर्धेतील अव्वल चार संघांना इंग्लंड व वेल्समध्ये २४ जून ते २३ जुलै दरम्यान रंगणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेसह आयसीसी महिला चॅम्पियनशीप स्पर्धेतही प्रवेश मिळेल.
जगज्जेते आॅस्टे्रलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज २०१४-१५ साली झालेल्या महिला चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल चार संघात राहिल्याने त्यांनी याआधीच विश्वचषक स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला आहे.
दरम्यान, मागील कामगिरी आणि रँकिंगच्या आधारे भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचा विश्वचषक प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र, बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यामध्ये अनपेक्षित निकाल देण्याची क्षमता असल्याने या चारही संघांना सावध रहावे लागेल.
दरम्यान, आयसीसी महिला क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतापुढे सुपरसिक्स गटात कठिण आव्हान असेल. कारण, नोव्हेंबर २०१४ साली घरच्या मैदानावर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुध्द १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. (वृत्तसंस्था)