दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारतीय कबड्डी संघांना दुहेरी जेतेपदाची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 03:55 PM2019-12-08T15:55:07+5:302019-12-08T15:56:33+5:30
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने शेवटच्या साखळी सामन्यात दणदणीत विजय मिळवला
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने शेवटच्या साखळी लढतीत दुबळ्या नेपाळला ६२-२६ असे धुवून काढत पुरुषांच्या विभागात अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारताची लढत श्रीलंका संघाशी होईल. श्रीलंकेने प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
काठमांडू-नेपाळ येथे सुरू असलेल्या “१३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील” पुरुष कबड्डीतील शेवटच्या साखळी सामन्यात यजमान नेपाळ कडून भारताला तसा प्रतिकार झालाच नाही. सुरुवाती पासूनच आक्रमक खेळ करीत भारताने मध्यांतराला ३२-१३ अशी मोठी आघाडी घेत नेपाळच्या आक्रमणातील हवाच काढून घेतली. उत्तरार्धात देखील तोच धडाका कायम राखत ३६गुणांच्या मोठ्या फरकाने आरामात हा सामना खिशात टाकला. पवन कुमार, दीपक हुडा, विशाल भारद्वाज, नितेश कुमार यांच्या चढाई-पकडीचा खेळ या विजयात महत्वाचा ठरला.
भारताची अंतिम लढत बांगला देशला नमविणाऱ्या श्रीलंका या संघाशी होईल. श्रीलंकेने बांगला देशला ३५-२० असे नमवित प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिलांचा अंतिम सामना भारत विरुद्ध नेपाळ असा होईल. भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघाना अंतिम फेरीचा पेपर तसा सोपा आहे. कबड्डीत भारत दोन सुवर्ण पदके मिळविणार हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.