दक्षिण कोरियाने जिंकली सुदिरमन चषक स्पर्धा
By admin | Published: May 29, 2017 12:30 AM2017-05-29T00:30:50+5:302017-05-29T00:30:50+5:30
दक्षिण कोरियाने रविवारी येथे १0 वेळेसचा चॅम्पियन चीनला ३-२ असा पराभव करताना १४ वर्षांत प्रथमच सुदिरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेचे
गोल्ड कोस्ट : दक्षिण कोरियाने रविवारी येथे १0 वेळेसचा चॅम्पियन चीनला ३-२ असा पराभव करताना १४ वर्षांत प्रथमच सुदिरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
विश्व संमिश्र सांघिक स्पर्धेत दक्षिण कोरियाचे हे चौथे विजेतेपद आहे. निर्णायक मिश्र दुहेरी लढतीत चोई सोल ग्यू आणि चेई यू जुंग याने २१-१७, २१-१३ असा विजय मिळवत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
प्रत्येक दोन वर्षांत होणाऱ्या या स्पर्धेत २00३ नंतर कोरियाचे हे पहिले विजेतेपद आहे आणि त्याचबरोबर चीनचे १४ वर्षांच्या वर्चस्वालादेखील तडा बसला आहे. १९९१ आणि १९९३ मध्येदेखील सुदिरमन चषकात विजेतेपद पटकावणारा दक्षिण कोरियाचा संघ एक वेळ १-२ ने पिछाडीवर होता; परंतु अखेरच्या दोन लढती त्यांनी जिंकताना ही स्पर्धा ३-२ फरकाने जिंकली. (वृत्तसंस्था)