दक्षिणोचा ‘मध्य’ धक्का
By Admin | Published: November 30, 2014 01:15 AM2014-11-30T01:15:35+5:302014-11-30T01:15:35+5:30
मध्य विभागाचा 116 धावांनी दणदणीत पराभव करीत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. उपांत्य फेरीत दक्षिण विभागापुढे बलाढय़ पश्चिम विभागाचे तगडे आव्हान असेल.
मुंबई : बाबा अपराजितचा (113) शतकी तडाखा आणि त्यानंतर कर्णधार आर. विनय कुमारचा (3/8) भेदक मारा या जोरावर दक्षिण विभागाने देवधर चषक स्पर्धेत मध्य विभागाचा 116 धावांनी दणदणीत पराभव करीत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. उपांत्य फेरीत दक्षिण विभागापुढे बलाढय़ पश्चिम विभागाचे तगडे आव्हान असेल.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मध्य विभागाने नाणोफेक जिंकताना दक्षिण विभागाला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. या संधीचा पुरेपूर फायदा उचलताना दक्षिण विभागाने 5क् षटकांत 9 बाद 296 अशी भक्कम मजल मारली. बाबा अपराजित याने 113 धावांचा तडाखा देत संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली.
यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मध्य विभागाला दक्षिण विभागाचे आव्हान सुरुवातीपासूनच पेलवले नाही. निराशाजनक सुरुवात झालेल्या मध्य विभागाचे आघाडीचे 3 फलंदाज अवघ्या 4 धावा फलकावर लागलेल्या असताना परतले. येथेच मध्य विभागाचा पराभव स्पष्ट दिसू लागला. हे तीनही फलंदाज विनय कुमारने बाद करताना मध्य विभागाच्या तंबूत खळबळ माजवली. यानंतर सलामीवीर मुकुल दागर (47) आणि पाचव्या क्रमांकावरील आनंद बायस (19) यांनी 59 धावांची भागीदारी करताना संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हे दोघेही लगेच बाद झाल्यानंतर मध्य विभागाची अवस्था 5 बाद 82 अशी झाली. यानंतर ठरावीक अंतराने गडी बाद करण्यात दक्षिण विभागाला यश आल्याने अखेर मध्य विभागाला 116 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. अजिर्त गुप्ताने सर्वाधिक 66 धावा फटकावल्या.
तत्पूर्वी बाबा अपराजितने 1क्5 चेंडूंत 8 चौकार व 2 उत्तुंग षटकार खेचताना 113 धावांची आक्रमक शतकी खेळी साकारताना संघाला दक्षिण विभागाला मोठी धावसंख्या गाठून दिली. तसेच करुण नायर (62 चेंडूंत 74, 9 चौकार) व मयांक अगरवाल (53 चेंडूंत 35) यांनी उपयुक्त खेळी करीत अपराजितला चांगली साथ दिली. त्याचवेळी पंकज सिंगने अचूक मारा करताना 45 धावांत 5 गडी बाद करीत दक्षिण विभागाच्या धावसंख्येला वेसण घालण्यासाठी एकाकी झुंज दिली. (क्रीडा प्रतिनिधी)