दाक्षिणात्य संस्कृतीने फेडले डोळ्यांचे पारणे, PM मोदींच्याहस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 05:47 AM2022-07-29T05:47:45+5:302022-07-29T05:48:21+5:30

पंतप्रधानांनी केले उद्घाटन

Southern culture paid off in the blink of an eye, inaugurated by PM Modi | दाक्षिणात्य संस्कृतीने फेडले डोळ्यांचे पारणे, PM मोदींच्याहस्ते उद्घाटन

दाक्षिणात्य संस्कृतीने फेडले डोळ्यांचे पारणे, PM मोदींच्याहस्ते उद्घाटन

Next

चेन्नई : भारतात पहिल्यांदाच आयोजन होत असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला गुरुवारी जबरदस्त सोहळ्याद्वारे सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर त्यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी दाक्षिणात्य संस्कृतीचे शानदार सादरीकरण करत आयोजकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सुपरस्टार अभिनेता रजनिकांत यांची उपस्थिती या सोहळ्यात आकर्षणाचे केंद्र ठरली.

बुद्धिबळ खेळाचा विश्वचषक अशी ओळख असलेल्या या ४४ व्या स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत भारतीयांनी यावेळी जगभरातील उपस्थित बुद्धिबळप्रेमींचे लक्ष वेधले. स्टेडियमबाहेर आकर्षक रोषणाई करण्यासह भलामोठा चेसबोर्ड साकारण्यात आला होता. यावर स्पर्धेतील सहभागी देशांचे ध्वज फडकावण्यात आले होते. १० ऑगस्टपर्यंत येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची चुरस रंगेल. ज्या मार्गावरून मोदी स्टेडियमवर जाणार होते, त्या संपूर्ण मार्गावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच मार्गात संगीतकार आणि वादकांनी आपले अप्रतिम सादरीकरण करत पंतप्रधानांचे जल्लोषात स्वागत केले. स्टेडियममध्ये प्रवेश करत असताना मोदी यांच्यावर फुलांचा वर्षावही करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्यादरम्यान भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन घडवून आयोजकांनी विदेशी खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे मन जिंकले. ऑर्केस्ट्राच्या धमाकेदार सादरीकरण आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रिया, अल्बानिया, अल्जेरिया, अंगोला, अर्जेंटिना आणि बार्बाडोस यांच्यासह इतर सर्व स्पर्धक देशांच्या संघांचे दिमाखात स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय शास्त्रीय नृत्याचे सर्व आठ प्रकार कथ्थक, ओडिसी, कुचुपुडी, कथक्कली, मोहिनीअट्टम, मणिपुरी, सत्तिया आणि भरतनाट्यम यांचे सादरीकरण करण्यात आले.
स्टेडियममध्ये बुद्धिबळ खेळातील राजा, राणी, हत्ती, ऊंट, घोडा आणि प्यादा यांच्या मोठ्या प्रतिकृती साकारून केलेली आकर्षक सजावट लक्षवेधी ठरली. उद्घाटन सोहळ्यादरम्यान मोदी यांच्यासह केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राज्यपाल आर. एन. रवी यांचीही उपस्थिती होती.

लोकांच्या लक्षात राहील ऑलिम्पियाड : मोदी
भारतात पहिल्यांदाच आयोजित होत असलेले बुद्धिबळ ऑलिम्पियाड विशेष बाब असून, ही स्पर्धा जगभरातील लोकांच्या कायम लक्षात राहील. लोकांना आणि समाजाला एकत्र आणण्याची ताकद खेळांमध्ये आहे. कोरोना महामारीदरम्यानही खेळांनीच जगाला जोडून ठेवले. भारताने ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि मूक-बधिर ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करीत आपले सर्वोत्तम प्रदर्शन सादर केले. त्यामुळे देशात या भव्य स्पर्धेचे आयोजन करणे, एक सकारात्मक आणि अत्यंत योग्य पाऊल ठरले आहे. खेळामध्ये कोणीही पराभूत होत नाही. यामध्ये विजेता आणि भविष्यातील विजेता असतो. आज मी बुद्धिबळ ऑलिम्पियाड आणि बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. 

काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानची माघार
 बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू होण्याआधी देशभर भ्रमंतीवर असलेली टॉर्च रिले काश्मीरमध्ये फिरविल्यावरून पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली आहे. ४४ व्या ऑलिम्पियाडमध्ये १८८ देशातील १७०० खेळाडूंचा सहभाग आहे.

Web Title: Southern culture paid off in the blink of an eye, inaugurated by PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.