FIFA Women's World Cup : लेकीनं देशाला बनवलं वर्ल्ड चॅम्पियन पण 'बाप' नावाच छत्र हरपलं, वाचा हृदयद्रावक कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 01:57 PM2023-08-21T13:57:22+5:302023-08-21T13:57:45+5:30
महिला फिफा विश्वचषक २०२३ चा किताब स्पेनने उंचावला.
FIFA Women's World Cup : महिला फिफा विश्वचषक २०२३ चा किताब स्पेनने उंचावला. अंतिम सामन्यात इंग्लंडला १-० अशा फरकाने पराभवाची धूळ चारत स्पेनने विजयावर शिक्कामोर्तब करून इतिहास रचला. लक्षणीय बाब म्हणजे २०११ नंतर प्रथमच फिफा महिला फुटबॉलला नवा चॅम्पियन मिळाला आहे. स्पेनने प्रथमच महिला फिफा विश्वचषक जिंकला. फायनल सामन्यात स्पेनसाठी ऐतिहासिक आणि निर्णायक गोल करणाऱ्या ओल्गा कार्मोनाच्या या विजयाचा आनंद सामना संपल्यानंतर दु:खात बदलला. कारण आपल्या देशाला जगज्जेते बनवणाऱ्या लेकीनं तिचे वडील कायमचे गमावले होते.
स्पेनच्या खेळाडूची हृदयद्रावक कहाणी
स्पॅनिश फुटबॉल महासंघाने सोमवारी याबाबत माहिती दिली असून कार्मोनाचे वडील आजारी असल्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. कार्मोनाची आई आणि इतर नातेवाईक अंतिम सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. रविवारी सिडनी ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या फायनल सामन्यात स्पेनने इंग्लंडचा पराभव करून महिला फिफा विश्वचषकाला एक नवीन चॅम्पियन दिला. स्पेनसाठी कर्णधार ओल्गा कार्मोनाने विजयी गोल केला. या एका गोलच्या जोरावर स्पेनने १-० असा विजय नोंदवला. हा गोल २९व्या मिनिटाला झाला आणि यासह स्पेन संघ प्रथमच विश्वविजेता बनला. दुसरीकडे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्याचे इंग्लंडचे स्वप्न भंगले.
स्पॅनिश खेळाडू भावुक
आपले वडील या जगात नसल्याचे स्पेनच्या खेळाडूला सामन्यानंतर समजले. वडिलांच्या निधनानंतर कार्मोनाने एक भावुक पोस्ट करत म्हटले, "सामना सुरू होण्यापूर्वी माझ्यासोबत माझा 'स्टार' होता. मला माहित आहे की तुम्ही मला काहीतरी विशेष साध्य करण्याची शक्ती दिली आहे. मला माहित आहे की, आज रात्री तुम्ही मला पाहत असाल आणि तुम्हाला माझा अभिमान वाटत असेल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो डॅड."
Y sin saberlo tenía mi Estrella antes de que empezase el partido. Sé que me has dado la fuerza para conseguir algo único. Sé que me has estado viendo esta noche y que estás orgulloso de mí. Descansa en paz, papá 🌟❤️🩹 pic.twitter.com/Uby0mteZQ3
— Olga Carmona (@7olgacarmona) August 20, 2023
स्पेनची ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडचे स्वप्न भंगले
फिफा महिला विश्वचषक जिंकण्याबरोबरच स्पेन गतविजेत्यांप्रमाणे एकाच वेळी तिन्ही फिफा विश्वचषक विजेतेपद जिंकणारा पहिला संघ ठरला. स्पेनने २०२२ मध्ये फिफा अंडर-१९ विश्वचषक, २०२२ मध्ये अंडर-२० महिला विश्वचषक आणि २०२३ मध्ये फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यासह स्पेन संघ महिला फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा पाचवा संघ ठरला आहे. अमेरिकेने सर्वाधिक चारवेळा फिफा विश्वचषकाचा किताब पटकावला आहे.