स्पेनला आघाडी
By admin | Published: September 17, 2016 04:55 AM2016-09-17T04:55:42+5:302016-09-17T04:55:42+5:30
रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी यांना अनुक्रमे फेलिसियानो लोपेज् व डेव्हिड फेरर यांच्याविरुद्ध पहिल्या दिवशी डेव्हिस चषक विश्व ग्रुप प्ले आॅफ टेनिस स्पर्धेत
नवी दिल्ली : रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी यांना अनुक्रमे फेलिसियानो लोपेज् व डेव्हिड फेरर यांच्याविरुद्ध पहिल्या दिवशी डेव्हिस चषक विश्व ग्रुप प्ले आॅफ टेनिस स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यामुळे स्पेनला ०-२ अशी आघाडी मिळाली.
के. खन्ना टेनिस स्टेडियमच्या कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या एकेरीत भारताच्या रामकुमार रामनाथनला स्टार खेळाडू राफेल नदालच्या जागी खेळत असलेल्या फेलिसियानो लोपेज्ने ४-६, ४-६, ६-३, १-६ असे पराभूत केले. रामकुमारने आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला; मात्र मजबूत प्रतिस्पर्ध्याविरोधात तो फारसा टिकू शकला नाही. जगात २६व्या क्रमाकांचा खेळाडू फेलिसियानो लोपेज्ने मार्क लोपेज्सह फ्रेंच ओपनचे दुहेरीतील विजेतेपद पटकावले आहे. २०३ रँकिंग असलेल्या रामकुमारने लोपेज्ला झुंजवले.
दुसऱ्या लढतीत भारताच्या साकेत मायनेनीलासुद्धा जागतिक क्रमवारीत १३व्या क्रमांकावर असलेल्या डेव्हिड फेररकडून एक तास २८ मिनिटे चाललेल्य लढतीत १-६, २-६, १-६ असे पराभूत व्हावे लागले.
प्ले-आॅफच्या दुसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी खेळाडू लिएंडर पेस व साकेत मायनेनी फेलिसियानो लोपेज् व मार्क लोपेज् या जोडीविरुद्ध मैदानात उतरतील. तिसऱ्या दिवसी रिव्हर्स एकेरीत साकेतचा सामना नदाल तर रामनाथनला फेररच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
पोटदुखीमुळे नाही मनगटाच्या
दुखापतीमुळे नदालची माघार : लोपेज्
जगातील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू स्पेनच्या राफेल नदाल याने पोटदुखीमुळे माघार घेतली नसून त्याच्या मनगटाला दुखापत झाल्यामुळे तो आज खेळू शकला नसल्याचे स्पेनचा खेळाडू फेलिसियानो लोपेज् याने सांगितले. त्याने असेसुद्धा पुढे नमूद केले की, दुहेरीच्या सामन्यामध्ये नदाल उतरण्याची शक्यता आहे.
डेव्हिस कपमध्ये नदालची लढत भारताच्या रामकुमार रामनाथन याच्यासोबत होणार होती. मात्र, नदाल पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी आता फेलिसियानो लोपेज् मैदानात उतरेल. डीएलटीए स्टेडिअममध्ये होणाऱ्या या सामन्यात नदाल प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होता. मात्र, त्याच्या माघारीने टेनिसप्रेमी निराश झाले आहेत.