स्पेनच्या महिला फुटबॉल संघ नवी मुंबई महापालिकेच्या मैदानाच्या प्रेमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2022 07:19 PM2022-10-08T19:19:42+5:302022-10-08T19:20:51+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्पेनच्या संघाला सामन्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
नवी मुंबई : येत्या ११ ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत भारतात होत असलेल्या १७ वर्षांखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे ५ सामने नेरूळ, नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये १२, १५, १८, २१ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहेत.
यातील पहिला सामना १२ ऑक्टोबर रोजी होत असून या अनुषंगाने नवी मुंबईत होणाऱ्या सामन्यांसाठी आलेल्या संघांपैकी स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने शनिवारी सकाळी १० ते १०.३० या वेळेत नवी मुंबई महानगरपालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकसित केलेल्या सेक्टर १९ ए, नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील फुटबॉल मैदानावर सराव केला. रात्रीपासून थोड्याफार प्रमाणात पाऊस असल्याने सराव मैदानांची पाहणी करून स्पेन संघाच्या प्रशिक्षकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर पाणी निचरा होण्याची चांगली व्यवस्था असल्याने सरावासाठी याच मैदानाची निवड केली.
याठिकाणी पाऊस पडत असतानाही फुटबॉल मैदान अतिशय उत्तम स्थितीत असल्याने व त्याठिकाणी नियोजनबद्ध व्यवस्था व आखणी करून ठेवलेली असल्याने स्पेनच्या प्रशिक्षकांनी मैदानाची पाहणी करून मैदानाच्या स्थितीबद्दल समाधान व्यक्त करून तेथील व्यवस्थेची प्रशंसा केली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्पेनच्या संघाला सामन्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.