आई-वडिलांनी केलेले कौतुक स्पेशल! राहुल आवारेचे पुण्यात जोरदार स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 12:49 PM2019-09-25T12:49:42+5:302019-09-25T12:51:22+5:30
इतर खेळाडूंप्रमाणे मीदेखील प्रत्येक लढत जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतो. कधी यश मिळते, तर कधी अपयश...
पुणे : जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर आई-वडिलांनी केलेले कौतुक माझ्यासाठी स्पेशल आहे. जन्मदात्यांनी केलेल्या या कौतुकामुळे माझा ऊर अभिमानाने भरून आला, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया महाराष्ट्राचा गुणवान मल्ल राहुल आवारे याने मंगळवारी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
कझाखस्तान येथील नूर सुलतान शहरात ही स्पर्धा नुकतीच झाली. यात फ्री स्टाईल प्रकारात ६१ किलो वजन गटामध्ये राहुलने कांस्यपदक पटकावले. या शानदार कामगिरीनंतर तो मंगळवारी संध्याकाळी पुण्यात परतला. यावेळी विमानतळावर त्याचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत झाले. कुस्तीशौकिन, राहुल सराव करतो त्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील सहकारी, मित्र, कुस्ती संघटनेचे तसेच शासनाच्या क्रीडा विभागाचे पदाधिकारी यांनी विमानतळावर गर्दी केली होती.
राहुलचे विमानतळावर आगमन होताच सर्वांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. संकुलातील सहकाऱ्यांनी त्याला उचलून घेत आपल्या लाडक्या खेळाडूचे स्वागत केले. या स्वागताने राहुल भारावून गेला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, प्रशिक्षक काका पवार, राज्याचे क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, वस्ताद गोविंद पवार, गोकुळ तालमीचे वस्ताद व्यंकट परसे, राहुलचे वडील बाळासाहेब, आई शारदाबाई या वेळी उपस्थित होते.
...........
पदक जिंकल्याचे सार्थक झाल्याची भावना
आपल्या भावना व्यक्त करताना राहूल म्हणाला, ‘‘कुस्ती हेच माझे सर्वस्व आहे. इतर खेळाडूंप्रमाणे मीदेखील प्रत्येक लढत जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतो. कधी यश मिळते, तर कधी अपयश. यामुळे कधी कौतुक होते, तर कधी टीकेला सामोरे जावे लागते. या दोन्ही गोष्टींना मी सहजपणे सामोरा जातो. मात्र, ज्यांचे रक्त माझ्या धमन्यांत वाहत आहे, त्या आईवडिलांनी कौतुक केल्यावर मला आकाश ठेंगणे झाले होते. त्यांच्या चेहºयावरील आनंद बघून जागतिक स्पर्धेत पदक जिंकल्याचे सार्थक झाल्याची भावना माझ्या मनात उमटली.’’