केदारविरुद्ध विशेष योजना
By admin | Published: March 15, 2017 01:13 AM2017-03-15T01:13:43+5:302017-03-15T01:13:43+5:30
महाराष्ट्राचा संघ चांगला असून त्यांच्याविरुद्ध अटीतटीची लढत होईल. त्यांचा स्टार फलंदाज केदार जाधव सध्या फॉर्ममध्ये असून त्याच्याविरुद्ध विशेष योजना
नवी दिल्ली : महाराष्ट्राचा संघ चांगला असून त्यांच्याविरुद्ध अटीतटीची लढत होईल. त्यांचा स्टार फलंदाज केदार जाधव सध्या फॉर्ममध्ये असून त्याच्याविरुद्ध विशेष योजना आम्ही आखल्या आहेत, अशी माहिती पश्चिम बंगालचा कर्णधार मनोज तिवारी याने दिली.
बुधवारी विजय हजारे चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगाल महाराष्ट्रविरुद्ध भिडेल. या सामन्याआधी तिवारीने आपली प्रतिक्रिया दिली. भारताकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चमक दाखवलेला केदार इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून सध्या जबरदस्त
फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच,
महाराष्ट्राच्या कर्णधाराला रोखण्यासाठी पश्चिम बंगाल कोणतीही कसर
ठेवणार नाही.
तिवारीने म्हटले, ‘‘केदार मॅचविनर असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय तो प्रतिस्पर्धी संघातील सर्वात धोकादायक फलंदाज आहे, यावर कोणतेही दुमत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगवान गोलंदाज मारा करीत असताना त्याला बाद करणे आवश्यक आहे. डावाच्या सुरुवातीला तो अडखळतो आणि आम्हाला याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे.’’
त्याचप्रमाणे, ‘‘आम्ही ५ प्रमुख गोलंदाजांसह खेळणार असून मी, प्रग्यान ओझा आणि आमिर गनी या आमच्या फिरकी जोडीला केदारला गोलंदाजी करताना लेंथ तपासण्याबाबत सूचना दिली आहे. त्याला स्वीप फटका खेळण्याची संधी न देण्याबाबतही सांगितले आहे.’’
तिवारी म्हणाला, ‘‘केदार पारंपरिक आणि रिव्हर्स स्वीप खूप चांगल्या प्रकारे खेळतो. त्यामुळे या फटक्यांपासून त्याला रोखणे गरजेचे आहे. शिवाय महाराष्ट्र संघाकडे आतापर्यंत ४०१ धावा काढलेला युवा फलंदाज ॠतुराज गायकवाडही आहे.’’ (वृत्तसंस्था)