लोढा शिफारशींवर विशेष आमसभेत चर्चा होणार
By admin | Published: June 13, 2017 04:49 AM2017-06-13T04:49:25+5:302017-06-13T04:49:25+5:30
भारतीय क्रिकेट बोर्डाची (बीसीसीआय) विशेष आमसभा (एसजीएम) २६ जून रोजी होणार आहे. या बैठकीदरम्यान संघासाठी नव्या कोचच्या निवडीवर कुठलीही
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट बोर्डाची (बीसीसीआय) विशेष आमसभा (एसजीएम) २६ जून रोजी होणार आहे. या बैठकीदरम्यान संघासाठी नव्या कोचच्या निवडीवर कुठलीही चर्चा होणार नाही. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबाजवणी कशी करायची, यावर मंथन मात्र होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या या समितीच्या शिफारशी बीसीसीआय आणि मान्यताप्राप्त राज्य संघटनांमध्ये कशा लागू करायच्या; यावर सविस्तर चर्चा केली जाईल, शिवाय दुबईत २९ मे रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत झालेल्या बैठकीतील मुद्यांवर चर्चा होणार आहे. बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी सर्व राज्य संघटनांना पाठविलेल्या नोटीसमध्ये सात मुद्यांवर चर्चा केली जाईल, असे लिहिले आहे. त्यात पीसीबीसोबतच्या बैठकीचा मुद्दादेखील आहे. बोर्डाचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी मागच्या महिन्यात दुबईत पीसीबी चेअरमन शहरयार खान यांच्यासोबत चर्चा केली होती.
अनिल कुंबळे हेच कोचपदी कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खन्ना यांनी चौधरी यांना एक पत्र लिहून कोच निवड प्रक्रिया वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत स्थगित करण्याचा आग्रह केला होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची क्रिकेट सल्लागार समितीदेखील दीर्घकाळ सहकारी राहिलेले कुंबळे यांनाच कायम ठेवण्यास पसंती दर्शवित असल्याची माहिती आहे. याशिवाय आयसीसी बैठकीचा अहवाल, सीओएद्वारा ३० जानेवारीपासून घेतलेल्या निर्णयाची चित्रफीत, या मोसमात झालेले दौरे आणि द्विपक्षीय मालिका, जम्मू काश्मीर तसेच राजस्थान क्रिकेट बोर्डातील क्रिकेटची प्रगती, आसाम क्रिकेट संघटनेने बांधलेले नवे स्टेडियम तसेच काम पूर्ण करण्यासाठी मागितलेले अर्थसाहाय्य आदी मुद्देदेखील आमसभेत चर्चेला येणार आहेत. (वृत्तसंस्था)