फिरकीपटू सर्वाधिक यशस्वी ठरतील
By admin | Published: April 11, 2017 04:02 AM2017-04-11T04:02:53+5:302017-04-11T04:02:53+5:30
आयपीएलच्या दहाव्या सत्राला सुरुवात होऊन जवळपास आठवडा झाला असून अनेक सामने खेळून झाले आहेत. विशेष म्हणजे काही स्टार खेळाडू जसे की मिशेल स्टार्क, विराट कोहली, के. एल.
- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)
आयपीएलच्या दहाव्या सत्राला सुरुवात होऊन जवळपास आठवडा झाला असून अनेक सामने खेळून झाले आहेत. विशेष म्हणजे काही स्टार खेळाडू जसे की मिशेल स्टार्क, विराट कोहली, के. एल. राहुल, आर. आश्विन हे खेळत नसल्याने प्रेक्षकांचा पाठिंबा कमी लाभेल अशी चर्चा होती; मात्र असे झाले नाही. आतापर्यंत झालेला प्रत्येक सामना हाऊसफुल झाला. त्यामुळे आयपीएल ही भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक भक्कम संस्था असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच एखादा खेळाडू असण्या-नसण्याने विशेष काही फरक पडत नाही. पण, १०-१२ मोठे खेळाडू दरवेळी स्पर्धेबाहेर राहिले तर मात्र याचा परिणाम पडू शकतो. एका सत्राने काही फरक पडणार नाही.
दुसरं म्हणजे, यंदाचा उद्घाटन सोहळा खूप वेगळा ठरला. सर्वांत मोठा हैदराबाद येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्यात सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग या ‘बिग फोर’चा सन्मान झाला. त्याच वेळी, यामध्ये राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे का नाही सहभाग झाले, याचा मला मोठा प्रश्न पडला. हे दोघेही महान खेळाडू आहेत. शिवाय जर काही कारणास्तव हे दोघे अनुपस्थित होते तर त्या सोहळ्याला वेगळे स्वरूप दिले गेले पाहिजे होते, हे माझे मत आहे. आतापर्यंत जे सामने खेळले गेले, त्यामध्ये सर्वांत चांगला संघ हैदराबादचा दिसून आला. दोन्ही खेळलेल्या सामन्यांत त्यांनी बाजी मारली आहे. बाकी सर्व संघांनी एक सामना जिंकला आहे, तर एक सामना गमावला आहे. त्यामुळे, ही स्पर्धा बरोबरीची होणार असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, हैदराबाद संघाबाबत सांगायचे झाल्यास, ते जोशमध्ये असून चांगल्या लयीत आहेत. डेव्हिड वॉर्नर फॉर्ममध्ये आहे. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हा संघ खूप समतोल आहे. त्यांच्याकडे चांगले फलंदाज, चांगले फिरकी गोलंदाज, चांगले वेगवान गोलंदाज आहेत. तसेच युवराज सिंगही जुन्या फॉर्ममध्ये आला. पण, तरीही ही केवळ सुरुवात आहे. पुढे काय होईल ते कोणालाही माहीत नाही. पण एक मात्र खरे की, हैदराबादने जबरदस्त सुरुवात केली आहे. वैयक्तिक कामगिरीविषयी म्हणायचे झाल्यास, भारतीय खेळाडूंपैकी कोहली, जडेजा आणि उमेश यादव अजूनपर्यंत खेळले नाहीत. तरी, जे खेळाडू भारतीय संघात परतण्यासाठी उत्सुक आहेत, त्यापैकी युवराज सिंग चांगल्या फॉर्ममध्ये आला आहे, सुरेश रैनाने धावा केल्या आहेत; मात्र निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासारखी कामगिरी अजून झालेली नाही. शिखर धवनही लक्ष वेधून घेत आहे, तसेच करुण नायरही झगडत आहे. या खेळाडूंचे प्रमुख लक्ष्य भारतीय संघात स्थान मिळवण्याचेच आहे. आयपीएल टी-२० आहे आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी ५० षटकांची स्पर्धा आहे. पण तरीही आयपीएलची कामगिरी या खेळाडूंसाठी निर्णायक ठरू शकते.
दुसऱ्या खेळाडूंच्या बाबतीत सांगायचे झाल्यास वॉर्नर आणि ख्रिस लीन यांनी जबरदस्त फलंदाजी केली आहे. शिवाय राशिद खान या अफगाणिस्तानच्या फिरकीपटूने सर्वांचे लक्षच वेधले आहे. त्याला अंतिम संघात स्थान देऊन हैदराबादने एकप्रकारे जुगारच खेळला होता आणि त्यात ते यशस्वी ठरले. तसेच लिलावामध्ये बाहेर पडलेला आणि अंतिम क्षणी पुण्याने आपल्या संघात घेतलेल्या इम्रान ताहीरने शानदार कामगिरी केली आहे.
एकूणच फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. युजवेंद्र चहल, कृणाल पांड्या, कुलदीप यादव
हे सर्वच चमकले आहेत. त्यामुळे
टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाज फिरकी गोलंदाजी संपवतील ही जी भीती
होती ती दूर झाली आहे. त्यामुळे
मी म्हणेल की, फिरकीपटूच सर्वाधिक यशस्वी ठरतील आणि तेच सर्वाधिक बळी घेतील.