क्रीडा प्रबोधिनी उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 02:52 AM2018-10-05T02:52:42+5:302018-10-05T02:53:37+5:30
अखिल भारतीय हॉकी : १६ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत एसएनबीपी, मध्य प्रदेश, जय भारत संघही अंतिम आठमध्ये
पुणे : तिसऱ्या १६ वर्षांखालील मुलांच्या अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत पुण्याची क्रीडा प्रबोधिनी, आयोजक एसएनबीपी अकादमी यांच्यासह मध्य प्रदेश हॉकी असोसिएशन आणि हरियाणाच्या जय भारत हॉकी या संघांनी गुरुवारी आपापल्या गटांतून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अॅस्ट्रो टर्फ मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. ड गटाच्या सामन्यात क्रीडा प्रबोधिनीने हॉकी कुर्ग संघाचा ११-० असा धुव्वा उडविला. विजयी संघाकडून अक्षय शेंडे याने ४ गोल, आदित्य लालगे व धैर्यशील जाधव यांनी प्रत्येकी दोन गोल, तर अशोक उरगुडे, मुस्ताफा शेख व प्रथमेश हजारे यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाला सहज विजय मिळवून दिला. क गटाच्या सामन्यात हरियाणातील जय भारत हॉकी संघाने मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन संघाचा ५-१ असा सहज पराभव करून आगेकूच केली. ब गटाच्या सामन्यात मध्य प्रदेश हॉकी असोसिएशन संघाने गुमान हेरा रायझर्स संघाचा ३-१ असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. अब्दुल अहाड, प्रियो बात्रा व शैलेंद्र सिंग यांनी गोलपूर्ण कामगिरी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. पूर्वार्धात दोन्ही संघ १-१ने बरोबरीत होते. रायझर्सतर्फे एकमेव गोल साहिलकुमार याने केला.
पहिल्या ३ मिनिटांतच शादाबची हॅट्ट्रिक
अ गटाच्या सामन्यात आयोजक एसएनबीपी अकादमीने हॉकी धुळे संघाचा १३-० असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. एसएनबीपीच्या शादाब मोहम्मद याने हॅट्ट्रिकसह ३ गोल केले. पहिल्या ३ मिनिटांतच ३ गोल डागत शादाबने प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरवली. याशिवाय नरेश चाटोळे याने तीन, अभिषेक माने याने दोन, तर प्रतीक सोळंकी, नागेश वाघमारे, अजय गोटे, ऋषीकेश मांडाळे व अभिषेक खालगे यांनी प्रत्येकी एकेक गोल केले. पूर्वार्धातच ९-० अशी मोठी आघाडी घेत एसएनबीपीने आपला विजय निश्चित केला होता.
निकाल : जय भारत हॉकी, भिवानी, हरियाणा : ५ (अग्यापाल २, हरीष ज्युनिअर १, भरत कौशिक १, गोविंद १) वि. वि. मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन : १ (हृतिक गुप्ता).
क्रीडा प्रबोधिनी : ११ (अक्षय शेंडे ४, आदित्य लालगे २, अशोक उरगुडे १, मुस्ताफा शेख १, धैर्यशील जाधव २, प्रथमेश हजारे १) वि. वि. हॉकी
कुर्ग : ०.
एसएनबीपी अकादमी : १३ (शादाब मोहम्मद ३, नरेश चाटोळे ३, अभिषेक माने २, प्रतीक सोळंकी १, नागेश वाघमारे १, अजय गोटे १, ऋषीकेश मांडाळे १, अभिषेक खालगे १) वि. वि. हॉकी धुळे : ०.
मध्य प्रदेश हॉकी असोसिएशन :
३ (अब्दुल अहाड १, प्रियो बात्रा १, शैलेंद्र सिंग १) वि. वि. गुमान हेरा रायझर्स : १ (साहील कुमार).
मध्य प्रदेश हॉकी अकादमी,
भोपाळ : ९ (प्रियो बात्रा २, शैलेंद्र सिंग २, मुदासार कुरेशी २, सादम अहमद १, अली अहमद १, डिंकू शर्मा १) वि. वि. कोहिनूर अकादमी : ०.
स्पोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ गुजरात :
१ (गौरांग अंबूलकर) वि. वि. हॉकी शिंदेवाही : ०.