खेळात लोकशाही पद्धत योग्य नाही
By admin | Published: April 8, 2016 03:19 AM2016-04-08T03:19:05+5:302016-04-08T03:19:05+5:30
क्रिकेटमध्ये होणारा आर्थिक नफा मोजक्याच व्यक्ती आणि संस्थांमध्ये विभागण्यात येत असल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला फटकारले.
नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये होणारा आर्थिक नफा मोजक्याच व्यक्ती आणि संस्थांमध्ये विभागण्यात येत असल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला फटकारले. यावर मत मांडताना बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी मात्र अधिक लोकशाही खेळाच्या हिताची नसल्याचे म्हटले आहे. सर्वच राज्य संघटनांनी कुणावर विसंबून न राहता स्वत: कमाई करण्यास शिकायला हवे, असेही ठाकूर म्हणाले.
फेसबुकवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत ठाकूर म्हणाले,‘‘सर्वच राज्यांना समान आर्थिक वाटा मिळणे शक्य नाही. लोकशाही पद्धत येथे लागू करणे योग्य नाहीच. खेळात लोकशाही आल्यामुळेच फिफासारख्या सर्वोच्च संस्थेत संघर्ष उफाळून आला आहे. क्रिकेटमधील सर्वोच्च संस्था आयसीसीमध्ये नफ्याची विभागणी कामगिरीच्या आधारे केली जाते. कसोटी सामने खेळणाऱ्या आघाडीच्या संघांना सहयोगी सदस्यांच्या तुलनेत अधिक अनुदान मिळते.
आयसीसीसोबत सहयोगी आणि संलग्न सदस्य देश जुळले आहेत. पूर्ण सदस्य, सहयोगी सदस्य आणि संलग्न सदस्य यांच्यासोबत आयसीसी वेगवेगळा व्यवहार करते. संपूर्ण जगात हाच व्यवहार लागू आहे. संलग्न संघटनांनी स्वत: कमवायला शिकले पाहिजे. दुसऱ्यांवर विसंबून राहिलो, तर विकास होणार नाही, याची जाणीव असायला हवी. (वृत्तसंस्था)