क्रीडा महासंघांनी आर्थिक सुबत्ता शोधावी : क्रीडामंत्री राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:19 AM2018-02-27T01:19:58+5:302018-02-27T01:19:58+5:30
भारतीय आॅलिम्पिक संघटनेसह (आयओए) सर्वच क्रीडा महासंघाने स्वत: पुढाकार घेत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी केले आहे.
नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेसह (आयओए) सर्वच क्रीडा महासंघाने स्वत: पुढाकार घेत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी केले आहे. आयओएने मात्र आर्थिक मदतीशिवाय क्रिकेट वगळता अन्य खेळ जिवंत राहू शकणार नसल्याची भूमिका घेत शासकीय मदत घेतच राहणार असे म्हटले आहे.
राष्टÑकुल स्पर्धेच्या अधिकृत पोषाखाचे क्रीडामंत्र्यांच्या हस्ते सोमवारी वितरण करण्यात आले. ते म्हणाले, ‘खेळात सर्वांत मोठे प्रायोजक भारत सरकार आहे. आम्ही सतत खेळासाठी पैसा देतो. तथापि क्रीडा महासंघांनी स्वत:साठी स्वत: निधी उभारावा अशीही आमची भूमिका आहे. अनेक कॉर्पोरेट्स खेळांना मदत करू इच्छितात, पण त्यांना क्रीडा महासंघात पारदर्शीपणा हवा आहे. सामूहिक जबाबदारी स्वीकारून काम केल्यास महासंघ प्रायोजकांची मने जिंकू शकतात.’
आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांनी क्रीडा महासंघ शासकीय मदतीविना चालू शकणार नाहीत, असे स्पष्ट करत म्हटले, ‘आयओएसह अन्य क्रीडा महासंघांनी आर्थिकदृष्ट्या भक्कम व्हायला हवे हे आमचेही मत आहे पण आम्ही शासकीय अनुदान घेत राहणार.’
कॉर्पोरेट्सने राष्टÑीय क्रीडा विकास कोषात योगदान द्यावे, असे आवाहन करीत क्रीडामंत्री म्हणाले,‘कॉर्पोरेट्सच्या योगदानातून खेळाडूंची मोठी फळी घडविण्यास देशाला मदत होईल. कॉर्पोरेट्सला पारदर्शीपणा दाखविण्यासाठी क्रीडा महासंघांनी क्रीडा संहिता लागू करायला हवी. यामुळे महासंघांचे व्यवस्थापन पारदर्शी बनेल. खेळाडू आणि अधिकाºयांमध्ये शिस्त निर्माण झाल्यानंतर मिळालेल्या विजयाचा आनंद आणखी वेगळा ठरू शकतो यावर सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे.’
२२७ सदस्यांचा भारतीय संघ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणार -
आॅस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे ४ ते १५ एप्रिलदरम्यान होणाºया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे २२७ खेळाडू सहभागी होतील. २0१४ साली ग्लास्गो येथे झालेल्या स्पर्धेच्या तुलनेत गोल्डकोस्ट येथे चांगली कामगिरी करील अशी आशा आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीच्या अधिकृत पोशाखाच्या अनावरणप्रसंगी व्यक्त केली.
बत्रा म्हणाले, ‘आम्ही आॅस्ट्रेलियाच्या गोल्डकोस्ट येथे ४ ते १५ एप्रिलदरम्यान होणाºया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २२७ जणांचे पथक पाठवणार आहोत. या स्पर्धेत आतापर्यंतचे भारताचे दुसºया क्रमांकाचे मोठे पथक असेल.’ भारताने नवी दिल्लीत २0१0 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ६१९ खेळाडू खेळवले होते आणि तेव्हा त्यांनी ३८ सुवर्णपदकांसह एकूण १0१ पदके जिंकली होती. त्याच्या चार वर्षांनंतर ग्लास्गोत भारताच्या २१५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात त्यांनी १५ सुवर्णपदकांसह ६४ पदके जिंकली होती.
बत्रा म्हणाले, ‘आमचे काही संघ गोल्डकोस्ट येथे सराव करीत आहेत. त्यात वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स, बास्केटबॉलचा समावेश आहे. आम्ही ग्लास्गो येथे ६४ पदके जिंकली होती; परंतु या वेळेस आम्हाला कामगिरी उंचावली जाण्याची अपेक्षा आहे. आम्ही खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा देत आहोत.’
भारतीय संघ कोणालाही नमवण्यास सक्षम -
भारतीय संघ जगातील कोणत्याही संघाला पराभूत करण्यास सक्षम असल्याचे मत भारताचा मिडफिल्डर मनप्रीतसिंगने व्यक्त केले. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत भारत नक्कीच पदक जिंकणार, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हॉकीचा दर्जा खूप उंचावलेला आहे. यात अनेक दिग्गज संघांचा सहभाग असतो. या स्पर्धेत भारतीय संघाला पदक जिंकण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, असे २५ वर्षीय मनप्रीतसिंगने म्हटले. ग्लास्गोमध्ये पदक जिंकल्यानंतर खूप सुधारणा झाल्याचेही मनप्रीत म्हणतो.
तो म्हणाला, ‘आम्ही राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्याही संघाला कमी लेखणार नाही. आॅस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अन्य संघ स्पर्धेत सहभागी होतील. गेल्या वेळेस आम्ही आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झालो होतो आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या वेळेस सर्वोत्तम कामगिरीसह पदक जिंकू, अशी आशा आहे.’ तो म्हणाला की, २0१४ च्या ग्लास्गो स्पर्धेनंतर आम्ही खूप सुधारणा केली आहे. आम्ही जगातील सर्वच तुल्यबळ संघाला पराभूत केले असून कोणत्याही संघाला नमवू शकतो.’
१९९८ मध्ये राष्ट्रकुलमध्ये हॉकीचा समावेश केल्यानंतर आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वच सुवर्णपदके जिंकली आहेत. या स्पर्धेसाठी ३ ते १0 मार्चदरम्यान होणाºया अझलन शाह स्पर्धेसाठी मनप्रीतसह चार खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.