खेळांचा गेम - अनधिकृत संघटनांनी मांडलाय खेळांचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:32 AM2017-10-06T03:32:56+5:302017-10-06T03:33:13+5:30
सद्य:स्थितीत महाराष्ट्रासह देशभरात अनधिकृत संघटनांनी खेळांचा बाजार मांडला असून, त्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे.
नवनाथ खराडे
अहमदनगर : सद्य:स्थितीत महाराष्ट्रासह देशभरात अनधिकृत संघटनांनी खेळांचा बाजार मांडला असून, त्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे. काही वर्षांपूर्वी खेळांची संख्या वाढविल्यामुळे आपोआपच संघटनांची संख्याही वाढली; मात्र अधिकृत व अनधिकृत संघटना कोणती, याबाबत खेळाडू व पालक अनभिज्ञ असल्याने स्पर्धांच्या नावाखाली आर्थिक लूट सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविले म्हणून सध्या अनेक खेळाडूंची नावे वाचायला मिळतात. मात्र, यात मोठा भूलभुलैया सुरू आहे. शालेय स्पर्धांचे आयोजन शासनाच्या क्रीडा विभागाकडून केले जाते. याव्यतिरिक्त इतर स्पर्धांचे आयोजन त्या-त्या खेळांच्या संघटना करतात. मात्र, या संघटना अधिकृत असतील, तरच त्या खेळाडूंना सवलतीचा लाभ मिळतो. सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत संघटनांनी खेळांचा बाजार मांडलेला आहे. या संघटनांचा आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती, आंतरराष्ट्रीय खेल महासंघ, भारतीय आॅलिम्पिक महासंघ, राज्य आॅलिम्पिक संघांशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही.
वरील संघांशी संलग्न नसलेल्या अनेक संघटना महाराष्ट्र व देशभर कार्यरत आहेत. त्या वेळोवेळी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करीत असतात. त्यासाठी ते मान्यता असल्याचे सांगत मार्केटिंग करतात. सरकारी सवलती मिळत असल्याचेही सांगण्यात येते. शिष्यवृत्ती, रोख पुरस्कारही मिळणार असल्याचा प्रचार केला जातो. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी या अनधिकृत संघटना खेळाडंूकडून मोठ्या प्रमाणात शुल्क म्हणून पैसा जमा करतात. एकाच जिल्ह्यातून अनेक संघांची निवड करून व्यावसायिकता साधली जाते.
अधिकृत संघटना
कशी ओळखावी?
खेळाची जिल्हा संघटना राज्य संघटनेशी संलग्न असावी. राज्य संघटना ही राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असावी, तसेच या संघटनेस राज्य आॅलिम्पिक असोसिएशनची मान्यता हवी. राष्ट्रीय संघटनेला इंडियन आॅलिम्पिक असोसिएशनची मान्यता हवी. अशी साखळी नसलेली संघटना अनधिकृत म्हणून ओळखली जाते.