क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी तिरंदाजी पदक विजेत्यांची भेट घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:02 AM2017-10-13T01:02:07+5:302017-10-13T01:02:28+5:30
जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची गुरुवारी केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी भेट घेतली.
नवी दिल्ली : जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची गुरुवारी केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी भेट घेतली. अर्जेंटिना येथील रोसारियो येथे २ ते ८ आॅक्टोबर दरम्यान झालेल्या या सांघिक स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पटकावून सातवे स्थान पटकावले होते.
2004 सालच्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलेल्या राठोड यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांची भेट घेऊन संघाच्या एकूण कामगिरीविषयी आणि खेळाडूंना मिळालेल्या प्रशिक्षणाविषयी चर्चाही केली. अंकिता भक्त आणि एन. जेमसन सिंग यांनी ज्यूनिअर रिकर्व्ह दुहेरी प्रकारता भारताला सुवर्ण मिळवून दिले.
तसेच जेमसन, अतुल वर्मा आणि सुखमणी गजानन बाब्रेकर यांनी ज्यूनिअर पुरुष रिकर्व्ह सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळवले. दुसरीकडे, मुलींच्या कॅडेट कंपाऊंड गटात खुशबू धयाल, संचिता तिवारी आणि दिव्या धयाल यांनी कांस्य पटकावले होते.