क्रीडा मंत्रालयाची शिफारस प्रशंसनीय
By admin | Published: June 9, 2017 04:10 AM2017-06-09T04:10:45+5:302017-06-09T04:10:45+5:30
ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोक कुमार यांनी क्रीडा मंत्रालयाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
नवी दिल्ली : भारतीय हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या नावाची सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’साठी शिफारस पंतप्रधान कार्यालयाकडे केल्याबद्दल ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोक कुमार यांनी क्रीडा मंत्रालयाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करीत माजी कर्णधार अशोक कुमार यांनी आधीच्या यूपीए सरकारला धारेवर धरले. मागच्या सरकारने आपल्या कार्यकाळादरम्यान माझ्या वडिलांकडे सारखी डोळेझाक केल्याचा अशोक कुमार यांनी आरोप केला. ते म्हणाले,‘मोदी यांच्या नेतृत्वात आता नव्याने काहीतरी होईल. सरकार ध्यानचंद यांच्या कर्तृत्वाची दखल घेत असल्याबद्दल मी या प्रयत्नांना वंदन करतो. देशभरातील हॉकीप्रेमी या प्रयत्नांची प्रशंसा करीत असून आम्ही हॉकी कुटुंबीय आनंदी आहोत. ’
काल क्रीडामंत्री विजय गोयल यांनी मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले होते. या पुढाकाराबद्दल अशोककुमार यांनी गोयल यांचेही आभार मानले.(वृत्तसंस्था)