साथीदाराचा चेंडू सानियाच्या कोर्टात
By admin | Published: September 15, 2015 11:54 PM2015-09-15T23:54:36+5:302015-09-15T23:54:36+5:30
जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थानावर असलेली महिला टेनिसपटू सानिया मिर्झा पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतातर्फे
नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थानावर असलेली महिला टेनिसपटू सानिया मिर्झा
पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतातर्फे दुहेरीतील सहकारी म्हणून कुणाची निवड
करेल, याबाबत चर्चा सुरू झालेली आहे. दुहेरीतील सहकारी म्हणून
मी किंवा पेस यापैकी कुणाची
निवड करायची याचा अधिकार
केवळ सानियाकडे आहे, असे मत दुहेरीतील दिग्गज खेळाडू रोहन बोपन्नाने व्यक्त केले.
जागतिक क्रमवारीत दुहेरीत १३ व्या स्थानावर असलेला रोहन बोपन्ना रिओ आॅलिम्पिकसाठी मिश्र दुहेरीबाबतच्या चर्चेला उत्तर देताना म्हणाला, ‘आॅलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत सानिया कुणासोबत खेळणार, हे सांगण्याचा आम्हाला
अधिकार नाही. जोडीदाराची निवड करण्याचा अधिकार सानियाचा
आहे. मी किंवा पेस यांच्यापैकी ती कुणाची निवड करते, हे स्पष्ट होईलच.’
बोपन्ना वर्षातील अखेरच्या ग्रॅण्डस्लॅम यूएस ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत तर मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत पराभूत झाला तर पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावले. मिश्र दुहेरीत पेसचे यंदाच्या मोसमातील हे तिसरे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे. सानियानेही हिंगीसच्या साथीने महिला दुहेरीत जेतेपद पटकावले. विम्बल्डननंतर सानियाचे हे सलग दुसरे गॅ्रण्डस्लॅम विजेतेपद आहे.
रिओ आॅलिम्पिकसाठी सानियाला पेस किंवा बोपन्ना यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. सानिया या दोन्ही खेळाडूंसोबत मिश्र दुहेरीमध्ये यापूर्वीही खेळलेली आहे. बोपन्ना म्हणाला,‘मी आणि पेस दोघेही सानियासोबत खेळण्यास उत्सुक आहोत, पण सानिया कुणाच्या साथीने खेळण्यास इच्छुक आहे, याला अधिक
महत्त्व आहे. ती दुहेरीमध्ये अव्वल क्रमांकाची खेळाडू आहे. जोडीदाराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सानियाचा आहे.’
पुरुष दुहेरीबाबत बोलताना बोपन्ना म्हणाला,‘आॅलिम्पिकमध्ये ६० ते ६५ पर्यंत संयुक्त मानांकन असलेले खेळाडू सहभागी होतात. सध्या आपल्याकडे मी व पेसशिवाय दुसरा पर्याय नाही.’ बोपन्नाने लंडन आॅलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत पेसच्या साथीने खेळण्यास नकार दिला होता, हे येथे उल्लेखनीय.
ज्यावेळी मी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सहभागी होतो त्यावेळी माझ्यात आत्मविश्वास असतो. फ्लोरिन मेर्जियाच्या साथीने माझी कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे, असेही बोपन्नाने एका उत्तरात स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
मी अनेक जोडीदार बदलले, पण दुहेरीमध्ये जोडीदार बदलणे लाभदायक ठरत नाही. ताळमेळ साधण्यासाठी अडचण भासते. मेर्जियासोबत माझा ताळमेळ चांगला आहे. आमच्याकडे विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत चांगली संधी होती. आम्ही पाचव्या सेटमध्ये विजया समीप पोहोचल्यानंतर पराभूत झालो. जर अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरलो असतो तर जेतेपद पटकावता आले असते. आम्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरत आहोत. आम्हाला लवकरच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावण्यात यश मिळेल.
- रोहन बोपन्ना