जय हो... पदकांचा श्रीगणेशा झाला; आशियाई स्पर्धेत भारताने जिंकले ५ मेडल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 05:25 AM2023-09-25T05:25:59+5:302023-09-25T05:27:07+5:30

आशियाई क्रीडा; नौकानयन, नेमबाजीमध्ये फडकला तिरंगा

Sri Ganesha of Jhala Medals; India won 5 medals in the Asian Games | जय हो... पदकांचा श्रीगणेशा झाला; आशियाई स्पर्धेत भारताने जिंकले ५ मेडल

जय हो... पदकांचा श्रीगणेशा झाला; आशियाई स्पर्धेत भारताने जिंकले ५ मेडल

googlenewsNext

हांगझोउ (चीन) : १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा रंगारंग उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताने पदक तालिकेत स्थान पटकावताना पाच पदकांची कमाई केली. नौकानयन स्पर्धेत दोन रौप्य व एक कांस्य, तसेच नेमबाजीमध्ये एक रौप्य आणि एक कांस्य अशी पाच पदके पटकावत भारतीयांनी आपली छाप पाडली. 

नौकानयन स्पर्धेच्या दुहेरी लाइटवेट स्कल्समध्ये अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई करत भारतीय पदकांचे खाते उघडले. अर्जुन-अरविंद यांनी ६:२८.१८ सेकंदाची वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. जुंजी फान-मान सून या चिनी जोडीने ६:२३.१६ सेकंदाच्या वेळेसह सुवर्ण पटकावले. उझबेकिस्तानच्या शखजोद नुरमातोव-सोबिरजोन सफरोलियेव यांनी कांस्यपदकावर समाधान मानले. यानंतर पुरुष कॉक्स एट गटातही भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ५:४३.०१ सेकंदाची वेळ नोंदवली. चीनच्या संघाने २:८४ सेकंदाच्या वेळेसह वर्चस्व राखताना सुवर्ण जिंकले. 

भारतीय संघात नीरज, नरेश कलवानिया, नितीश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, पुनीत कुमार आणि आशिष यांचा समावेश होता. इंडोनेशिया संघाने कांस्य पदक पटकावले. यानंतर कॉक्सलेस दुहेरी प्रकारातही भारताच्या खात्यात एका कांस्यपदकाची भर पडली. बाबूलाल यादव-लेख राम यांनी ६:५०.४१ सेकंदाची वेळ नोंदवत कांस्य पदकावर नाव कोरले. हाँगकाँग चीन संघाने सुवर्ण तर उझबेकिस्तानने रौप्य पदक पटकावले. भारताने नौकानयनसाठी ३३ खेळाडूंचा चमू पाठविला आहे.

थोडक्यात हुकला ‘सुवर्ण’ नेम

नेमबाजीतही भारताने दोन पदकांची कमाई केली. परंतु महिला १० मीटर एअर रायफल सांघिक गटात केवळ १०.६ गुणांनी मागे राहिल्याने भारताला सुवर्ण पदकापासून दूर राहावे लागले. मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चौकसी या तिघींनी शानदार प्रदर्शन करत १८८६ गुणांसह रौप्य वेध घेतला. चीन संघाने १८९६.६ गुणांची नोंद करत आशियाई विक्रमासह सुवर्ण पदक पटकावले. मंगोलिया संघाने कांस्य पदकावर नाव कोरले. दुसरीकडे, ज्युनिअर विश्वविजेती रमिताने याच प्रकारात वैयक्तिक गटात कांस्य पदकाची कमाई केली. आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत रमिताने २३०.१ गुणांचा वेध घेत भारताची पदक संख्या वाढवली. चीनच्या हुआंग युटिंगने आशियाई क्रीडा स्पर्धांत विक्रम नोंदवताना २५२.७ गुणांसह सुवर्ण जिंकले. 

टेबल-टेनिसमध्ये भारतीय पुरुष पराभूत 

अचंथा शरथ कमलने अनुभवाच्या जोरावर अखेरच्या तीन गेम जिंकत भारतीय पुरुष टेबल-टेनिस संघाला कझाखस्तानविरुद्ध ३-२ असा विजय मिळवून देत उपांत्यपूर्व फेरीत नेले. पण पुरुष संघाला उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. महिला संघाला उपउपांत्यपूर्व फेरीत २-३ असा पराभवाचा सामना करावा लागला. पुरुषांमध्ये कझाखस्तान आणि भारत यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत होता. पुरुषांच्या पराभवामुळे भारताच्या पदकाच्या आशा संपल्या आहेत. 

जलतरणात श्रीहरी, महिला संघ अंतिम फेरीत
स्टार जलतरणपटू श्रीहरी नटराज आणि भारतीय महिला संघाने आशियाई स्पर्धेत अनुक्रमे १०० मीटर पुरुष बॅकस्ट्रोक आणि चार बाय १०० मी. फ्री स्टाईल रिलेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑलिम्पियन माना पटेल, धिनिधी देसिंघु, जानवी चौधरी आणि शिवांगी शर्मा ३.५३.८० सेकंद वेळेसह दहा संघांमध्ये सहाव्या क्रमांकावर राहिल्या. श्रीहरी ५४.७१ सेकंद वेळेसह पाचव्या क्रमांकावर राहिला. 

भारताचा उझबेकिस्तानवर १६-० असा विजय

हांगझोउ : ललित उपाध्याय, वरुण कुमार आणि मनदीप सिंह यांच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या हाॅकी लढतीत रविवारी उझबेकिस्तानवर १६-० असा विजय मिळवत विजयी सलामी दिली. टोकयो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील भारताने ए गटातील हा सामना सहज जिंकला. भारताकडून ललित उपाध्याय (७, २४, ३७ आणि ५३ वे मि.), मनदीप सिंह (१८, २७, २८ वे मि.) आणि वरुण कुमार (१२, ३६, ५०, ५२ वे मि.) यांनी हॅट्ट्रिक नोंदवली. अभिषेक (१७ वे मि.), सुखजीत सिंह (४२ वे मि.), शमशेर सिंह (४३ वे. मि.), अमित रोहिदास (३८ वे मि.) आणि संजय (५७ वे मि.) यांनी गोल केले. भारत आता २६ सप्टेंबरला सिंगापूर विरुद्ध खेळणार आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंहला या लढतीतून विश्रांती देण्यात आली होती. भारतीयांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवण्यात यश मिळविले. 

 पदक तालिका 
क्रमांक    देश    सुवर्ण    रौप्य    कांस्य    एकूण 
१    चीन    २०    ७    ३    ३०
२    कोरिया    ५    ४    ५    १४
३    जपान    २    ७    ५    १४
४    हाँगकाँग (चीन)    २    ०    ५    ०७
५    उझबेकिस्तान    १    ३    ३    ०७
६    चायनिज तैपई    १    २    १    ०४ 
७    भारत    ०    ३    २    ०५

 

Web Title: Sri Ganesha of Jhala Medals; India won 5 medals in the Asian Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.