श्रीलंका-आफ्रिका आमनेसामने
By admin | Published: March 28, 2016 03:35 AM2016-03-28T03:35:19+5:302016-03-28T03:35:19+5:30
उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेले दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघ सोमवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुपर टेनच्या ग्रुप-२ मध्ये एकमेकांसमोर विजय मिळवण्याच्या निर्धाराने
नवी दिल्ली : उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेले दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघ सोमवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुपर टेनच्या ग्रुप-२ मध्ये एकमेकांसमोर विजय मिळवण्याच्या निर्धाराने लढतील. या सामन्यात बाजी मारून स्पर्धेतून विजयी निरोप घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
इंग्लंडने दोन्ही संघांना नमवून स्पर्धेबाहेर केले. गतविजेते म्हणून श्रीलंकाने यंदा लौकिकानुसार खेळ केला नाही. त्याच वेळी टी-२० स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश असूनही दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर पडावे लागले. सलामीला इंग्लंडविरुद्ध २२९ धावांचा हिमालय उभारल्यानंतरही आफ्रिकेला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्याच
वेळी अफगाणिस्ताननेही त्यांना झुंजवले. विशेष म्हणजे यंदा दोन वेळा २०० चा टप्पा गाठूनही आफ्रिकेला पराभूत व्हावे लागले.
स्टार खेळाडूंची निवृत्ती, कर्णधार लसिथ मलिंगाची दुखापत आणि अनुभवी खेळाडूंचा खराब फॉर्म ही लंकेसाठी चिंतेची बाब ठरली. आफ्रिकासह लंकेनेही केवळ अफगाणिस्तानविरुद्ध विजय
मिळवला आहे. कर्णधार अँजेलो मॅथ्यूज, अष्टपैलू थिसारा परेरा,
दिनेश चंदिमल, तिलकरत्ने
दिलशान, रंगना हेराथ यांच्यावर संघाची मदार असेल.
दुसऱ्या बाजूला फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बाबतीत आफ्रिकेची बाजू मजबूत दिसत असली, तरी मोक्याच्यावेळी होणाऱ्या चुका त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरत आहेत.
संघ यातून निवडणार
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), दुश्मंता चमिरा, दिनेश चंदिमल, तिलकरत्ने दिलशान, रंगना हेराथ, शेहान जयसूर्या, चामरा कापूगेदरा, नुआन कुलशेखरा, सुरंगा लकमल, थिसारा परेरा, सचित्रा सेनानायके, दासून शानाका, मिलिंदा श्रीवर्धने, लाहिरु थिरीमाने.
दक्षिण आफ्रिका : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), काएल एबॉट, हाशिम आमला, फरहान बेहारदिन, क्विंटन डीकॉक, एबी डिव्हिलियर्स, इम्रान ताहीर, ख्रिस मॉरिस, डेव्हीड मिल्लर, अॅरोन फांगिसो, कागिसो रबाडा, रिली रोसो, डेल स्टेन आणि डेव्हीड विसे.
फिरोजशहा कोटला, दिल्ली
सायंकाळी ७.३० पासून