श्रीलंका-आॅस्ट्रेलिया पहिला टी-२० आज

By Admin | Published: September 6, 2016 02:27 AM2016-09-06T02:27:38+5:302016-09-06T02:27:38+5:30

आॅस्ट्रेलियाविरुद्ध प्रारंभ होणाऱ्या दोन टी-२० मालिका दिग्गज खेळाडू तिलकरत्ने दिलशानला विजयाने निरोप देण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

Sri Lanka-Australia first T-20 today | श्रीलंका-आॅस्ट्रेलिया पहिला टी-२० आज

श्रीलंका-आॅस्ट्रेलिया पहिला टी-२० आज

googlenewsNext


पल्लेकल : वन-डे सामन्यांच्या मालिकेत लाजिरवाणा पराभव स्वीकारणारा श्रीलंका संघ मंगळवारपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध प्रारंभ होणाऱ्या दोन टी-२० मालिका दिग्गज खेळाडू तिलकरत्ने दिलशानला विजयाने निरोप देण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ‘दिलस्कूप’चा जनक दिलशानची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका आहे.
श्रीलंकेने कसोटी मालिकेत आॅस्ट्रेलियाचा ३-० ने सफाया केला, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये श्रीलंका संघाचा संघर्ष कायम आहे. पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला ४-१ ने पराभव स्वीकारावा लागला. आता उभय संघांदरम्यान दोन टी-२० सामने खेळले जाणार आहे. त्यातील पहिली लढत मंगळवारी होणार असून दुसरी लढत ९ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे खेळली जाणार आहे.
या मालिकेनंतर निवृत्ती स्वीकारणार असल्याचे दिलशानने यापूर्वीच जाहीर केले आहे. मंगळवारी जर नशीबाने साथ दिली तर चाहत्यांना दिलशानच्या बॅटमधून मंगळवारी ‘दिलस्कूप’ बघायला मिळू शकतो. गुडघा जमिनीला टेकवत यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून हा फटका मारला जातो. वन-डे मालिकेदरम्यान आॅस्ट्रेलियाच्या अचूक माऱ्यापुढे दिलशानला हा फटका खेळण्याची संधी मिळाली नाही, पण या फटक्यामुळे त्याने क्रिकेट इतिहासात विशेष स्थान निर्माण केले आहे.
गेल्या आठवड्यात अखेरची वन-डे खेळल्यानंतर दिलशानने ‘दिलस्कूप’ची कहाणी कथन केली. दिलशान म्हणाला,‘मी सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध दिलस्कूल खेळण्याचा प्रयत्न केला होता. कारण यष्टिरक्षकाच्या मागे कुणी क्षेत्ररक्षक नसतो, याची मला कल्पना होती. मी त्याचा सराव केला आणि त्यानंतर २००९ च्या विश्वकप स्पर्धेत शेन वॉटसनविरुद्ध हा फटका खेळला. त्यावर सहा धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळे माझे मनोधैर्य उंचावले. हा फटका माझ्या नावाने ओळखल्या जातो, त्याचा मला आनंद आहे.’
श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज दुखापतग्रस्त असल्यामुळे या मालिकेत खेळणार नाही.(वृत्तसंस्था)

Web Title: Sri Lanka-Australia first T-20 today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.