आश्विनच्या फिरकीपुढे श्रीलंका चीत
By admin | Published: August 25, 2015 04:24 AM2015-08-25T04:24:45+5:302015-08-25T04:24:45+5:30
रविचंद्रन आश्विनच्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात २७८ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
कोलंबो : रविचंद्रन आश्विनच्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात २७८ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताने महान फलंदाज कुमार संगकाराला विजयाने निरोप देण्याच्या श्रीलंका संघाचे स्वप्न धुळीस मिळवले. भारताने विजयासाठी दिलेल्या ४१३ धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा दुसरा डाव पाचव्या व अखेरच्या दिवशी उपाहारानंतर ४३.४ षटकांत १३४ धावांत संपुष्टात आला. आश्विनने ४२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिला कसोटी विजय ठरला.
भारताने सुरुवातीपासून या लढतीत वर्चस्व कायम राखले. गॉलमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात पत्कराव्या लागलेल्या नाट्यमय पराभवादरम्यान झालेल्या चुकांपासून बोध घेत भारताने या लढतीत चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या बाजूचा विचार करताना संगकाराच्या चमकदार कारकिर्दीचा हा निराशाजनक शेवट ठरला. त्याला अखेरच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. श्रीलंका संघाने अखेरच्या ७ विकेट ५८ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. त्याआधी, पावसाच्या व्यत्ययामुळे निर्धारित वेळेपूर्वीच उपाहारासाठी खेळ थांबविण्यात आला. लेगस्पिनर अमित मिश्राने दुष्मंता चामिराला (४) बाद करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने उपाहारानंतर पाचव्या चेंडूवर विजय निश्चित केला. आश्विन व्यतिरिक्त मिश्राने २९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व उमेश यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
यजमान संघातर्फे दिमुथ करुणारत्नेने १०३ चेंडूंना सामोरे जाताना ४६ धावांची खेळी केली. करुणारत्नेचा अपवाद वगळता आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही.
उभय संघांदरम्यान तिसरा व निर्णायक कसोटी सामना २८ आॅगस्टपासून खेळला जाणार आहे.
श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. आज पहिल्याच चेंडूवर कर्णधार अँजेलो मॅथ्यूज बाद झाला. कालच्या २ बाद ७२ धावसंख्येवरून पुढे खेळताना श्रीलंकेने २२व्या षटकात कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची विकेट गमावली. उमेश यादवच्या गोलंदाजीवर तो बदली यष्टिरक्षक राहुलकडे झेल देऊन माघारी परतला. मिश्राने २८व्या षटकात दिनेश चांदीमलला (१५) तंबूचा मार्ग दाखविला. श्रीलंकेने ३०व्या षटकात शंभर धावांचा पल्ला गाठला. पहिल्या तासाभराच्या खेळानंतर श्रीलंकेची ४ बाद १०६ अशी अवस्था होती.
आश्विनने सहाव्या चेंडूवर लाहिरू थिरीमानेला (११) बाद केले. त्यानंतरच्या षटकात ईशांतने जेहान मुबारकला (०) खाते उघडण्यापूर्वीच दुसऱ्या स्लिपमध्ये कर्णधार कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. आश्विनने ३७व्या षटकात धम्मिका प्रसादला (०) आणि त्यानंतर दोन षटकांनी करुणारत्नेला तंबूचा मार्ग दाखवून डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. उपाहाराला १४ मिनिटांचा अवधी शिल्लक असताना मिश्राने थारिंडू कौशलला (५) पायचित केले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्यामुळे पंचांनी उपाहारासाठी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. उपाहारानंतर मिश्राने चामिराला बाद करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. (वृत्तसंस्था)
धावफलक
भारत पहिला डाव ३९३. श्रीलंका पहिला डाव ३०६. भारत दुसरा डाव ८ बाद ३२५ (डाव घोषित).
श्रीलंका दुसरा डाव : कौशल सिल्वा झे. बिन्नी गो. आश्विन ०१, दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. आश्विन ४६, कुमार संगकारा झे. विजय गो. आश्विन १८, अॅन्जेलो मॅथ्यूज झे. राहुल गो. यादव २३, दिनेश चांदीमल त्रि. गो. मिश्रा १५, लाहिरू थिरिमाने झे. पुजारा गो. आश्विन ११, जेहान मुबारक झे. कोहली गो. ईशांत ००, धम्मिका प्रसाद झे. मिश्रा गो. आश्विन ००, रंगाना हेराथ नाबाद ०४, थारिंडू कौशल पायचीत गो. मिश्रा ०५, दुष्मंता चामीरा पायचीत गो. मिश्रा ०४. अवांतर (७). एकूण ४३.४ षटकांत सर्व बाद १३४. बाद क्रम : १-८, २-३३, ३-७२, ४-९१, ५-१०६, ६-१११, ७-११४, ८-१२३, ९-१२८, १०-१३४. गोलंदाजी : आश्विन १६-६-४२-५, यादव ७-१-१८-१, ईशांत ११-२-४१-१, मिश्रा ९.४-३-२९-३.