श्रीलंकेची बांगलादेशवर मात

By admin | Published: April 2, 2017 02:18 AM2017-04-02T02:18:02+5:302017-04-02T02:18:02+5:30

नुवान कुलसेखराची भेदक गोलंदाजी आणि थिसारा परेराची स्फोटक खेळी या बळावर श्रीलंकेने शनिवारी येथे तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात

Sri Lanka beat Bangladesh | श्रीलंकेची बांगलादेशवर मात

श्रीलंकेची बांगलादेशवर मात

Next

कोलंबो : नुवान कुलसेखराची भेदक गोलंदाजी आणि थिसारा परेराची स्फोटक खेळी या बळावर श्रीलंकेने शनिवारी येथे तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात बांगलादेशवर ७0 धावांनी मात करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २८0 धावा केल्या. त्यानंतर त्यांनी बांगलादेशला ४४.३ षटकांत २१0 धावांत गुंडाळले. बांगलादेशने दाम्बुलात पहिला वनडे ९0 धावांनी जिंकला होता आणि पावसामुळे दुसऱ्या सामन्याचा निकाल लागला नव्हता.
बांगलादेशचा कर्णधार मशरफी मुर्तजाने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला फलंदाजीस आमंत्रित केले. दुसऱ्या वनडे सामन्यात शतक ठोकणाऱ्या कुशाल मेंडिसने या लढतीत श्रीलंकेकडून सर्वाधिक ५४, तर थिसारा परेराने ४0 चेंडूंत ५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशची सुरुवात खराब झाली आणि त्यांच्या आघाडीच्या सात फलंदाजांपैकी पाच फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्याही गाठू शकले नाही. शाकीब अल हसन (५४) आणि मेहदी हसन (५१) यांनी अर्धशतक ठोकले, तर सौम्या सरकारने ३८ धावांचे योगदान दिले.
श्रीलंकेतर्फे कुलशेखरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३७ धावांत ४ गडी बाद केले. सुरंगा लखमल आणि परेरा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा सामनावीर ठरला.
श्रीलंका जेव्हा प्रथम फलंदाजीस उतरला तेव्हा सलामीवीर फलंदाज धनुष्का गुणतिलक (३४) आणि उपुल थरंगा (३५) यांनी सुरेख फटकेबाजी केली. या दोघांनी सलामीसाठी ७६ धावांची भागीदारी केली. फिरकी गोलंदाज मेहदी हसन याने गुणतिलकला बाद करीत ही जोडी फोडली. तास्किन अहमदने श्रीलंकन कर्णधार उपुल थरंगाला तंबूत धाडले.
मेंडीसने दिनेश चांदीमलसह श्रीलंकेची स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न केला; परंतु दोन खेळाडू धावबाद झाल्याने श्रीलंकेचा
संघ संकटात सापडला.
चांदीमल २१ तर मिलिंडा सिरिवरदाना १२ धावांवर धावबाद झाले. बांगलादेशने नियमित अंतराने विकेटस् काढल्या; परंतु थिसारा परेराने मालिकेत दुसरे अर्धशतक ठोकताना संघाला सावरले. मुर्तजाने ६५ धावांत ३, तर मुस्तफिजूर रहमानने ५५ धावांत २ गडी बाद केले.(वृत्तसंस्था)


संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ५0 षटकांत ९ बाद २८0. (कुशाल मेंडीस ५४, थिसारा परेरा ५२, उपुल थरंगा ३५, धनुष्का गुणतिलक ३४, मुर्तजा ३/६५, मुस्तफिजूर रहमान २/५५).
बांगलादेश : ४४.३ षटकांत सर्वबाद २१0. (शाकीब अल हसन ५४, मेहदी हसन ५१, सौम्या सरकार ३८, नुवान कुलसेखरा ४/३७, सुरंगा लखमल २/३८, दिलरुवान परेरा २/४७).

Web Title: Sri Lanka beat Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.