श्रीलंकेचा विजय ‘तिलक’

By admin | Published: March 18, 2016 03:43 AM2016-03-18T03:43:51+5:302016-03-18T03:43:51+5:30

तिलकरत्ने दिलशानच्या ५६ चेंडंूत ८३ धावांच्या जोरावर श्रीलंकेने अफगाणिस्तानला ६ गडी राखून हरवीत टी-२० विश्वकप स्पर्धेत गुरुवारी अभियानाला विजयी प्रारंभ केला. अनुभवाच्या

Sri Lanka beat Tilak | श्रीलंकेचा विजय ‘तिलक’

श्रीलंकेचा विजय ‘तिलक’

Next

कोलकाता : तिलकरत्ने दिलशानच्या ५६ चेंडंूत ८३ धावांच्या जोरावर श्रीलंकेने अफगाणिस्तानला ६ गडी राखून हरवीत टी-२० विश्वकप स्पर्धेत गुरुवारी अभियानाला विजयी प्रारंभ केला. अनुभवाच्या अभावामुळे बळी घेण्यात आलेले अपयश आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे दीडशेच्यावर आव्हान उभारूनही अफगाणिस्तान या सामन्यात पराभूत झाला. दिलशानला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
प्रथम फलंदाजी करताना असगर स्टॅनिकजाईची (६२ धावा, ४७ चेंडू, ४ षट्कार, ३ चौकार) अर्धशतकी खेळी व त्याने शेनवरीसोबत (३१ धावा, १४ चेंडू) पाचव्या विकेटसाठी ५.३ षटकांत केलेल्या ६१ धावांच्या उपयुक्त भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्ध ७ बाद १५३ धावांची आव्हानात्मक मजल मारली होती.
या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने सावध सुरुवात केली. सलामीवीर दिनेश चांदिमलच्या रूपाने त्यांनी पहिला बळी गमावाला, पण दुसरा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान मात्र आज विजयी पताका फडकवायचीच असा निर्धार करून आला होता. त्याने धोकादायक फटक्यांचा मोह टाळत आपली खेळी सजवत नेली. ३७ चेंडूंत त्याने आपले अर्धशतक साजरे केले, तर १५ व्या षटकांत संघाचे शतक फलकावर लागले. शेवटच्या काही षटकांत आवश्यक धावगती प्रतिषटके ९ पर्यंत गेली असता कर्णधार मॅथ्यूजने झंझावाती १0 चेंडूंत २१ धावा केल्याने श्रीलंकेचा विजय सुकर झाला. या दबावाच्या वेळी अफगाणी क्षेत्ररक्षकांनी हातातले चेंडू सोडून चौकारांची शिदोरी वाटल्याने लंकेचे काम सोपे झाले. १८.५ षटकांत १५५ धावा करून श्रीलंका विजयी झाली.
तत्पूर्वी, कोलकातातील ईडन गार्डन मैदानावर नाणेफेक जिंंकून अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
अफगाणिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली. मोहम्मद शहजाद (८) झटपट माघारी परतला. त्यानंतर नूर अली जरदान (२०) व स्टॅनेकजाई यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. जरदान बाद झाल्यानंतर कलीम सादिक (०) व मोहम्मद नबी (३) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर समीउल्ला शेनवरी व स्टॅनिकजाई यांनी आक्रमक अर्धशतकी भागीदारी नोंदवत संघाला धावसंख्येचे शतक ओलांडून दिले. नजीबउल्ला जरदानने ३ चेंडूत आक्रमक १२ धावांची खेळी करीत संघाला दीडशेचा पल्ला ओलांडून दिला.

धावफलक
अफगाणिस्तान - मोहंमद शहजाद झे. चामिरा गो. मॅथ्यूज ८, नूर अली जरदान गो. हेराथ २०, असगर स्टॅनिकजाई झे. चांदीमल, गो. परेरा ६२, करीम सादीक झे. चांदीमल, गो. परेरा ०, मोहंमद नबी पायचित गो. हेराथ ३, समिउल्लाह शेनवारी झे. परेरा, गो. कुलशेखरा ३१, शफिकुल्लाह थिरिमाने गो. परेरा ५, जरदान नाबाद ५, नजीबुल्लाह जरदान नाबाद १२. इतर - ७, एकूण : २० षटकांत ७ बाद १५३ (१८.५) गोलंदाजी : मॅथ्यूज ३-०-१७-०१, कुलशेखरा ४-०-४३-१, चामिरा ४-०-१९-०, हेराथ ४-०-२४-२, परेरा ४-०-३३-३, सिरीवर्धने १-०-१६-०.
श्रीलंका : चांदीमल झे. शेनवरी गो. नबी १८, दिलशान नाबाद ८३, थिरीमाने गो. रशिद खान ६, परेरा धावचित मो. शेहजाद १२, कापुगेदरा धावचित नबी १०, मॅथ्यूज नाबाद २१. इतर - ५ एकूण : १८.५ षटकांत ४ बाद १५५. गोलंदाजी : करीम सादीक २-०-२१-०, हमीद हसन ३.५-०-३८-०, दवलत जरदान ३-०-३१-०, मो. नबी ४-१-२५-१, रशीद खान ४-०-२७-१, समीउल्लाह शेनवरी २-०-९-० .

Web Title: Sri Lanka beat Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.