विराटसेनेला लंकेचा शॉक!

By admin | Published: June 8, 2017 10:51 PM2017-06-08T22:51:08+5:302017-06-08T22:56:08+5:30

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराटसेनेला श्रीलंकेच्या अननुभवी संघाने आज शॉक दिला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज झालेल्या

Sri Lanka shock of Viratsena! | विराटसेनेला लंकेचा शॉक!

विराटसेनेला लंकेचा शॉक!

Next
>ऑनलाइन लोकमत
 लंडन, दि. 8 - जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराटसेनेला श्रीलंकेच्या अननुभवी संघाने आज शॉक दिला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज झालेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गुणतिलका, कुशल मेंडिस, कुशल परेरा कर्णधार अँजेलो मॅथ्युज आणि गुणरत्ने यांनी केलेल्या जिगरबाज खेळाच्या जोरावर श्रीलंकेने भारतावर सात गडी राखून मात केली.  
 भारताने दिलेल्या 322 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्का बसला. श्रीलंकेचा सलामीवीर निरोशन डिकवेला याला भुवनेश्वर कुमारने तंबूची वाट दाखवत भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र गुणतिलका (76) आणि मेंडिस (89) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी करत लंकेला सामन्यात पुनरागमन करून दिले.  दरम्यान, भारतीय क्षेत्ररक्षकांना चपळ क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करत या दोघांनाही माघारी धाडले. 
खेळपट्टीवर स्थिरावलेले दोन फलंदाज बाद झाल्यावर लंकेचा डाव अडखळेल, असे वाटले होते. पण कुशल परेरा आणि  अँजेलो मॅथ्युज यांनी 75 धावा जोडत सामन्याचे पारडे श्रीलंकेच्या बाजूने झुकवले. नाबाद 52 धावा फटकावणाऱ्या मॅथ्युजने गुणरत्नेच्या (नाबाद 34) साथीने विजयाची औपचारिकता पार पाडताना लंकेला. 49 व्या षटकात विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताला दमदार सुरुवात करून दिली.  रोहित-धवनने मागील सामन्याप्रमाणेच प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेत  24.5 षटकांत १३८ धावांची भागीदारी केली. दरम्यान रोहित 78 धावा काढून बाद झाला. या खेळीमध्ये त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले.  रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेला कर्णधार विराट कोहलीही पाठोपाठ माघारी परतला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. तर पाकिस्तानविरुद्ध स्टार ठरलेला युवराजही खेळपट्टीवर फार काळ तग धरु शकला नाही. गुणरत्नेने  सात धावांवर त्याचा त्रिफळा उडवला.
तीन फलंदाज झटपट बाद झाल्यावर धवन आणि धोनीने भारताला सावरले. कारकिर्दीतील दहावी शतकी खेळी करणाऱ्या धवनने धोनीसोबत 82 धावांची भागीदारी करत भारताला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.  मात्र अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजीच्या नादात तो बाद झाला. धोनीने 63 धावांची आक्रमक खेळी करत संघाला तीनशेपार नेले. तर केदार जाधवने 13 चेंडूत 25 धावा वसूल करत संघाला निर्धारीत 50 षटकांत 6 बाद 321 धावांपर्यंत मजल मारून दिली.   
 

Web Title: Sri Lanka shock of Viratsena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.