श्रीलंकेचा झिम्बाब्वेविरुद्ध विक्रमी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:20 AM2017-07-19T00:20:59+5:302017-07-19T00:20:59+5:30

निरोशन डिकवेला व असेला गुणरत्ने यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ३८८ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना मंगळवारी पाचव्या व अखेरच्या

Sri Lanka win a record against Zimbabwe | श्रीलंकेचा झिम्बाब्वेविरुद्ध विक्रमी विजय

श्रीलंकेचा झिम्बाब्वेविरुद्ध विक्रमी विजय

Next

कोलंबो : निरोशन डिकवेला व असेला गुणरत्ने यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ३८८ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना मंगळवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेल्या एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा ४ गडी राखून पराभव केला.
गुणरत्ने (नाबाद ८०) व डिकवेला (८१) यांनी सहाव्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी करीत श्रीलंकेला विक्रमी लक्ष्य गाठून दिले. यापूर्वी श्रीलंका संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वोत्तम कामगिरी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती. त्या वेळी त्यांनी ३५२ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. श्रीलंकेने आशियातील सर्वात मोठे लक्ष्य आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाचवे सर्वांत मोठे लक्ष्य गाठण्याचा पराक्रम केला.
डिकवेला बाद झाल्यानंतर सामनावीर गुणरत्नेने दिलरुवान परेराच्या (नाबाद २९) साथीने ६७ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. नवा कर्णधार दिनेश चंडीमलच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाला याच संघाविरुद्ध वन-डे मालिकेत २-३ ने पराभव स्वीकारावा लागला होता. आजच्या विजयामुळे त्या अपयशातून सावरण्यात श्रीलंका संघाला यश आले. झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रीम क्रिमरने दुसऱ्या डावात चार व सामन्यात एकूण २७५ धावांच्या मोबदल्यात ९ बळी घेतले. गुणरत्नेने १५१ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार लगावले.
यष्टिरक्षक फलंदाज डिकवेला याला डावखुरा फिरकीपटू सीन विल्यम्सने बाद केले. त्यापूर्वी सुदैवी ठरलेल्या डिकवेलाने ८१ धावांची खेळी केली. यष्टिरक्षक चकाबवाने सिकंदर रजाच्या गोलंदाजी डिकवेला वैयक्तिक ३७ धावांवर असताना यष्टिचित करण्याची संधी गमावली होती, तर वैयक्तिक ६३ धावांवर असताना त्याचा झेलही सोडला होता.
यष्टिचितची संधी गमावणे झिम्बाब्वे संघाला महाग पडले. हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपविण्यात आला होता. तिसऱ्या पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरविले. रिप्लेमध्ये फलंदाजाचा पाय रेषेवर असल्याचे दिसत होते. अशा प्रकरणात फलंदाजाला बाद दिले जाऊ शकते. यापूर्वी श्रीलंका संघाने कालच्या ३ बाद १७० धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. क्रिमरने कालचा नाबाद फलंदाज कुशल मेंडिसला (६६) झटपट माघारी परतवले आणि त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजला (२५) बाद केले. त्यानंतर डिकवेला व गुणरत्ने यांनी डाव सावरला. श्रीलंका यानंतर कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताविरुद्ध ३ कसोटी, ५ वन-डे व एक टी-२० सामना खेळेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Sri Lanka win a record against Zimbabwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.