श्रीलंकेला विजयी सलामीची संधी

By admin | Published: March 17, 2016 01:27 AM2016-03-17T01:27:07+5:302016-03-17T04:03:07+5:30

दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर नव्याने क्रिकेट वाटचालीस सुरुवात करणारा श्रीलंका गुरुवारी टी-२० विश्वचषकची सुरुवात उदयोन्मुख अफगाणिस्तानविरुद्ध करेल. अफगाणिस्तानकडे

Sri Lanka win a winning opportunity | श्रीलंकेला विजयी सलामीची संधी

श्रीलंकेला विजयी सलामीची संधी

Next

कोलकाता : दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर नव्याने क्रिकेट वाटचालीस सुरुवात करणारा श्रीलंका गुरुवारी टी-२० विश्वचषकची सुरुवात उदयोन्मुख अफगाणिस्तानविरुद्ध करेल. अफगाणिस्तानकडे अनपेक्षित निकाल नोंदविण्याची क्षमता असल्याची जाणीव असल्याने लंकेला पहिल्याच लढतीत सांभाळून खेळावे लागेल.
इडनगार्डन येथे होणारा हा सामना श्रीलंकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिजसारखे बलाढ्य संघ असताना अफगाणिस्तानला नमवून विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न लंकेचा असेल. गतविजेता श्रीलंका आतापर्यंत टी-२० विश्वचषकमधील यशस्वी संघ ठरला आहे. गतवर्षी बाजी मारलेल्या लंकेने २००९ व २०१२ मध्ये उपविजेतेपद पटकावले.
गतस्पर्धेत लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली भारताला नमवून जगज्जेता झालेल्या श्रीलंकेला त्यानंतर १४ सामन्यांपैकी केवळ ४ सामने जिंकता आले आहेत. गुडघ्याच्या दुखापतीमुळे कर्णधारपद सोडलेल्या मलिंगाच्या खेळण्याविषयी निश्चिती नसल्याने लंकेसमोर मोठे आव्हान असेल. अशा परिस्थितीत कर्णधार मॅथ्यूजपुढे अडचणीचा मार्ग असेल.
तरीही, आयसीसीच्या स्पर्धांचा मागोवा घेतल्यास श्रीलंकेने कायम चांगली कामगिरी केल्याचे लक्षात येईल. त्यामुळे त्यांचा अफगाणिस्तानविरुद्ध तरी विजय गृहीत धरला जात आहे. फिरकीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर श्रीलंकेचा मारा रंगाना हेराथवर अवलंबून असेल. फलंदाजांकडून त्यांना मोठ्या अपेक्षा असून तिलकरत्ने दिलशानचा हरवलेला फॉर्म लंकेच्या चिंतेचा विषय आहे. मात्र अफगाणिस्तानविरुद्ध तो दणक्यात पुनरागमन करू शकतो. तसेच दिनेश चंडीमल, लाहिरू थिरीमाने, अष्टपैलू थिसारा परेरा या खेळाडूंवरही लंकेची भिस्त आहे.

संघ यातून निवडणार
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), तिलकरत्ने दिलशान, स्नेहन जयसूर्या, सचित्रा सेनानायके, दिनेश चंडीमल, मिलिंदा सिरीवर्धना,चमारा कापुगेदरा, थिसारा परेरा, निरोशन डिकवेला, रंगाना हेराथ, नुवान कुलसेकरा, लसिथ मलिंगा, दुष्मंता चामीरा, दसुना शनाका आणि जाफरी वेंडेरसे.
अफगाणिस्तान : असगर स्टानिकजाइ (कर्णधार), मोहम्मद शहजाद, नूरअली जदरान, उस्मान गनी, मोहम्मद नबी, करीम सादिक, शफीकुल्लाह शफीक, रशीद खान, अमीर हमजा, दौलत जदरान, शापूर जदरान, गुलबदन नाइब, समीउल्लाह शेनवारी, नजीबुल्लाह जदरान आणि हामिद हसन.

हेड टू हेड
श्रीलंका व अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये अजूनपर्यंत एकही टी-२०चा सामना झालेला नाही. श्रीलंकेने एकूण ८० तर अफगाणिस्तानने ४४ सामने खेळले आहेत.

सामन्याची वेळ
सायंकाळी ७. ३०
स्थळ :
ईडन गार्डन, कोलकाता

Web Title: Sri Lanka win a winning opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.