श्रीलंका-झिम्बाब्वे कसोटी रंगतदार स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:09 AM2017-07-18T01:09:00+5:302017-07-18T01:09:00+5:30
झिम्बाब्वेने दिलेल्या ३८८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना कुशाल मेंडिसच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दिवसअखेर ३ बाद १७०
कोलंबो : झिम्बाब्वेने दिलेल्या ३८८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना कुशाल मेंडिसच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दिवसअखेर ३ बाद १७० धावांची मजल मारली. अखेरच्या दिवसाचा खेळ शिल्लक असलेला हा कसोटी सामना सोमवारी चौथ्या दिवसअखेर रंगतदार स्थितीत आहे.
झिम्बाब्वेने सिंकदर रजाचे (१२७) कारकिर्दीतील पहिले शतक व मॅलकम वॉलेर (६८) व कर्णधार ग्रीम क्रेमर (४८) यांच्या जोरावर चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ३७७ धावांची मजल मारली. श्रीलंकाने तीन विकेट गमावल्या असल्या तरी त्यांना लक्ष्य गाठण्याची संधी आहे.
श्रीलंकेला सामन्याच्या पाचव्या दिवशी मंगळवारी विजयासाठी २१८ धावांची गरज असून, त्यांचे ७ विकेट शिल्लक आहेत. श्रीलंकाची भिस्त कुशाल मेंडिस (नाबाद ६०) व अँजेलो मॅथ्यूज (नाबाद १७) यांच्यावर अवलंबून आहे. झिम्बाब्वेला कर्णधार क्रेमरकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. त्याने सलग १९ षटके टाकताना ६७ धावांत २ बळी घेतले. क्रेमरने उपुल थरंगा (२७) व कर्णधार दिनेश चंदीमललाही (१५) बाद केले. सीन विलियम्सने दिमुथ करुणारत्नेला (४९) बाद केले.
त्याआधी, सकाळच्या सत्रात ६ बाद २५२ धावसंख्येवरून पुढे खेळताना झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात ३७७ धावा उभारल्या. रजाने शतक पूर्ण करताना वॉलेरसह सातव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली. दिलरुवान परेराने (३/९५) ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर क्रेमरने रजाला चांगली साथ दिली. रजाची मॅरेथॉन खेळी रंगना हेराथने (६-१३३) संपुष्टात आणली. (वृत्तसंस्था)