श्रीलंकेच्या ‘अनोख्या’ जोडीचा प्रेरणादायी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 04:19 PM2019-10-23T16:19:08+5:302019-10-23T16:20:29+5:30
एकजुटीने पूर्ण केली गोव्यातील आयर्नमॅन शर्यत
सचिन कोरडे, पणजी : प्रत्येकाला जीवनाच्या एका टप्प्यात संघर्षातून जावे लागते. जो या स्थितीत हिमतीने पुढे जातो तोच किमयागार ठरतो. आदर्श ठरतो. आपल्या आजूबाजूला अशा बºयाच गोष्टी घडतात. ज्यामधून इतरांना नवी ऊर्जा मिळते. अशीच ऊर्जा देणारी कहाणी गोव्यातील आयर्नमॅन स्पर्धेतून बाहेर आली.
श्रीलंकेच्या अनोख्या जोडीची ही कहाणी अनेकांना चटका लावून गेली. अंध साथीदारासह अथांग सागरात पोहण्याचे आव्हान, न थांबता ९० किमी सायकलिंग आणि न थांबता २१ किमी धावण्याचे शिवधनुष्य जोडीने पेलेले. तेही एकजुटीने.
श्रीलंकन खालिद ओशमन (पूर्ण अंधत्व ) आणि मिथुन लियानेज (पूर्वी बहिरा होता) या दिव्यांग जोडीचं आयुष्य सामन्यांच्या कल्पनेपलीकडेचं आहे. प्रचंड मेहनती, पूर्ण सकारात्मकता यांच्या जोरावर ही जोडी नकारात्मतेवर मात करीत यशोशिखर गाठत आहेत. देशातील पहिल्या आॅयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ही जोडी भारतात आली. त्यांनी ही स्पर्धा पूर्णही केली. पोडीयममध्ये जेव्हा ही जोडी आली तेव्हा चाहत्यांनी नतमस्तक होत या जोडीचे स्वागत केले. तेव्हा वातावरण मनाला चटका लावून देणारे होते.
पहाटे ६ वाजता ही जोडी समुद्रात उतरली. एकमेकांना बेल्ट बांधून जेव्हा ते पोहत होते तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. खाणाखुणांवर त्यांनी १.९ किमीचे अंतर पूर्ण केले. खालीद हा आंधळा असल्याने त्याला मिथुन सहकार्य करीत होता. त्याच्या इशाºयावर तो समुद्रात पोहत होता. या दोघांनी सायकलिंगही सोबत केले. तसेच धावण्याची शर्यतही पूर्ण केली. एकमेकांना बांधून धावत असलेली ही जोडी अनेकांचे लक्ष वेधून घेत होती.
खालीदशी जेव्हा संवाद साधला तेव्हा तो म्हणाला, वयाच्या २६ व्या वर्षांपर्यंत मी ठिक होतो. मी २६ व्या वर्षीच माझा सर्व आशा गमावल्या. माझ्यासाठी जिणे अर्थहीन झाले होते. मी तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. २०११ मध्ये वैद्यकीय दुर्लक्षेतेमुळे डोळे गमावले. चुलतभावाने मला समजावून सांगितले तेव्हा माझ्यातील क्रीडापटूच्या प्रवासाला सुरुवात झाली. मी सध्या खूप चांगला आहे. मी तीन वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्या. खालीद ३५ वर्षांचा आहे. त्याने श्रीलंका क्रिकेट संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने मिथुन (३३) सोबत १.९ किमी स्विमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावण्याची शर्यतही पूर्ण केली. यासाठी त्यांनी ६ तास ४५ मिनिटांचा वेळ दिला.
मिथुन म्हणाला की, ओशमनचा जोडीदार असल्याचा मला अभिमान आहे. त्याच्याकडून मी खूप काही शिकलो. तो प्रत्येक दिवशी सराव करतो. तो नोकरी सुद्धा करतो. उत्तम जलतरणपटू असून त्याने श्रीलंकेत अनेकांना प्रेरणा दिली आहे.