श्रीलंकेचा १३८ धावांत खुर्दा
By admin | Published: December 28, 2014 01:03 AM2014-12-28T01:03:37+5:302014-12-28T01:03:37+5:30
श्रीलंकेने फॉलोआॅननंतर दुसऱ्या डावात चांगली सुरुवात करताना दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ८४ धावांपर्यंत मजल मारली आहे़
ख्राईस्टचर्च : पहिल्या डावात न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्यासमोर अवघ्या १३८ धावांत गारद झालेल्या श्रीलंकेने फॉलोआॅननंतर दुसऱ्या डावात चांगली सुरुवात करताना दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ८४ धावांपर्यंत मजल मारली आहे़
न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद ४४१ धावा केल्यानंतर श्रीलंकेचा डाव ४२़४ षटकांत १३८ धावांत गुंडाळला होता़ यामुळे किवी संघाने ३०३ धावांची मोठी आघाडी घेत लंकेला फॉलोआॅन दिला़ यानंतर पाहुण्या संघाच्या सलामीवीरांनी दुसऱ्या डावात टीमला चांगली सुरुवात करून दुसऱ्या दिवसअखेर संघाचा स्कोअर ३५ षटकांत बिनबाद ८४ पर्यंत पोहोचविला़
दरम्यान, असे असले तरी अद्याप लंका संघ बॅकफुटवर आहे़ त्यांना डावाने पराभव टाळण्यासाठी २१९ धावांची आवश्यकता आहे़ दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लंकेचा दिमुथ करुणारत्ने ४९ आणि कौशल सिल्वा ३३ धावांवर खेळत होता़
लंकेच्या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या निल वॅग्नर आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी ३ बळी मिळविले़ पहिल्या डावात केवळ लंकेचा कर्णधार एंजेलो मॅथ्यूज यालाच सर्वाधिक ५० धावांची खेळी करता आली़
त्याआधी न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी सकाळी ७ बाद ४२९ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि त्यांनी आपले अखेरचे ३ गडी १२ धावांत गमावले़
या सामन्यात दुसऱ्या दिवशी तब्बल १३ विकेट पडल्या़ पाहुण्या संघाची पहिल्या डावात ३ बाद १५ अशी अवस्था झाली होती़ यानंतर अखेरपर्यंत या संघाला सावरता आले नाही़ हा संघ १३८ धावांत तंबूत परतला; मात्र दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करताना आपली विकेट गमावली नाही़ (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड पहिला डाव : ८५़५ षटकांत सर्वबाद ४४१़ श्रीलंका पहिला डाव : ४२़४ षटकांत सर्वबाद १३८़ (एंजेलो मॅथ्यूज ५०, लाहिरू थिरीमाने २४, धम्मिका प्रसाद २४़ ट्रेंट बोल्ट ३/२५, निल वॅग्नर ३/६०, टीम साउथी २/१७, जेम्स निशाम २/२८)़
श्रीलंका दुसरा डाव : ३५ षटकांत बिनबाद ८४़ दिमुथ करुणारत्ने खेळत आहे ४९, कौशल सिल्वा खेळत आहे ३३़