श्रीलंकेचा मोठा विजय
By admin | Published: November 15, 2016 01:09 AM2016-11-15T01:09:20+5:302016-11-15T01:09:20+5:30
गोलंदाजांचा अचूक मारा आणि सलामीवीर धनंजय डिसिल्वाचे नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर श्रीलंकेने सोमवारी झिम्बाब्वेचा १५३ चेंडू व ८ गडी राखून पराभव केला
हरारे : गोलंदाजांचा अचूक मारा आणि सलामीवीर धनंजय डिसिल्वाचे नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर श्रीलंकेने सोमवारी झिम्बाब्वेचा १५३ चेंडू व ८ गडी राखून पराभव केला आणि वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. श्रीलंकेने झिम्बाब्वेचा डाव ४१.३ षटकांत १५४ धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा २४.३ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. सामनावीर डिसिल्वाने ७५ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकारांच्या
मदतीने नाबाद ७८ धावांची
खेळी केली. त्याने कुशल परेरासोबत (२१) सलामीला ५६ धावांची आणि निरोशन डिकवेलासोबत (४१) दुसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. डिकवेलाने ३८ चेंडूंच्या खेळीमध्ये ६ चौकार लगावले.
कुशल मेंडीस १२ धावा काढून नाबाद राहिला.
त्याआधी, झिम्बाब्वेची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांची सुरुवातीला ६ बाद ५० अशी नाजूक अवस्था झाली होती. त्यानंतर डावात सर्वाधिक धावा फटकावणारा यष्टिरक्षक फलंदाज पीटर मूर (४७) आणि कर्णधार ग्रीम क्रेमर (नाबाद ३१) यांनी सातव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. तळाच्या फळीतील फलंदाज डोनाल्ड टिरिपानो (१९) आणि टिनसे पेनयांगरा (१२) यांनी दुहेरी धावसंख्या नोंदवली.
श्रीलंकेतर्फे पहिला वन-डे साना खेळणारा गोलंदाज असेला गुणरत्नेने २१ धावांत ३ बळी घेतले. याव्यतिरिक्त सुरंगा लकमल, नुवान प्रदीप व
नुवान कुलशेखरा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. या मालिकेत सहभागी झालेला तिसरा संघ वेस्ट इंडीज आहे. या मैदानावर बुधवारी वेस्ट इंडीज आणि श्रीलंका संघांदरम्यान लढत होणार आहे. (वृत्तसंस्था)