श्रीलंकेचा संघर्षपूर्ण विजय

By admin | Published: February 23, 2015 02:22 AM2015-02-23T02:22:23+5:302015-02-23T02:22:23+5:30

अनुभवी माहेला जयवर्धनेच्या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी विश्वकप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध ४ गडी

Sri Lanka's struggling victory | श्रीलंकेचा संघर्षपूर्ण विजय

श्रीलंकेचा संघर्षपूर्ण विजय

Next

ड्युनेडिन : अनुभवी माहेला जयवर्धनेच्या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी विश्वकप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध ४ गडी राखून संघर्षपूर्ण विजय मिळविला. श्रीलंकेचा २०१५ च्या विश्वकप स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला.
युनिव्हर्सिटी ओव्हल मैदानावर २३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची एकवेळ ४ बाद ५१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर जयवर्धने (१००) व कर्णधार अँजेलो मॅथ्युज (४४) यांनी पाचव्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. थिसारा परेराने नाबाद ४७ धावांची आक्रमक खेळी करीत श्रीलंकेला ४८.२ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठून दिले.
त्याआधी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अफगाणिस्तान संघाचा डाव ४९.४ षटकांत २३२ धावांत संपुष्टात आला. अफगाणिस्तानतर्फे अशगर स्टॅनिकजई (५४) याने अर्धशतकी खेळी केली. त्याने समीउल्ला शेनवारीसोबत (३८) तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. श्रीलंकेतर्फे मलिंगा व मॅथ्युज यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर लाहिरू थिरीमाने व तिलकरत्ने दिलशान खाते उघडण्यात अपयशी ठरले.
कुमार संगकारा (७) आणि दिमुथ करुणारत्ने (२३) यांना मोठी खेळी करता आली नाही.
जयवर्धनेने कारकिर्दीतील ३५ वे शतक झळकावीत श्रीलंकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला अँजेलो मॅथ्युजची योग्य साथ लाभली. मॅथ्युज ४१ व्या षटकात धावबाद झाला; तर जयवर्धनेला हसनने तंबूचा मार्ग दाखविला. जयवर्धनेच्या शतकी खेळीत आठ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. ही जोडी माघारी परतल्यानंतर अफगाणिस्तान संघाच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. पण त्यानंतर जीवन मेंडिस (नाबाद ९) व परेरा यांनी सातव्या विकेटसाठी ५८ धावांची अभेद्य भागीदारी करीत श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. डावाच्या ४८ व्या षटकात हसनने मेंडिसविरुद्ध केलेले झेलचे अपील मैदानावरील पंचांनी उचलून धरले. मेंडिसने या निर्णयाविरोधात रेफरल घेण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी हा निर्णय बदलला. श्रीलंकेला सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आज श्रीलंकेला या स्पर्धेत गुणाचे खाते उघडण्यात यश आले. (वृत्तसंस्था)

Web Title: Sri Lanka's struggling victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.