श्रीकांतची उपांत्य फेरीत धडक
By admin | Published: June 24, 2017 02:08 AM2017-06-24T02:08:37+5:302017-06-24T02:08:37+5:30
स्टार शटलर किदाम्बी श्रीकांत याने आपला जबरदस्त फॉर्म कायम राखताना आॅस्टे्रलिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली
सिडनी : स्टार शटलर किदाम्बी श्रीकांत याने आपला जबरदस्त फॉर्म कायम राखताना आॅस्टे्रलिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी दुसरीकडे महिला गटात भारताच्या पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल या दोन्ही प्रमुख खेळाडूंन स्पर्धेबाहेर पडावे लागले. यासह महिला एकेरी गटातील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
पुरुष उपांत्यपुर्व फेरीमध्ये श्रीकांतपुढे भारताच्याच बी. साई प्रणीतचे आव्हान होते. याआधी सिंगापूर ओपन अंतिम सामन्यामध्ये प्रणीतने श्रीकांतला नमवले असल्याने हा सामना श्रीकांतसाठी महत्त्वाचा होता. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात श्रीकांतने २५-२३, २१-१७ अशी बाजी मारत आपल्या पराभवाचे हिशोबही चुकते केले. या सामन्याआधी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कोरियन खेळाडू सोन वानला नमवुन उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला होता.
दरम्यान, उपांत्य फेरीत श्रीकांतपुढे आॅल इंग्लंड स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणाऱ्या चीनच्या युकी शी याचे तगडे आव्हान असेल. हा सामना जिंकण्यात श्रीकांत यशस्वी ठरला, तर तो सलग तिसऱ्या सुपर सिरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारेल.
दुसरीकडे महिला गटात भारताच्या पदरी निराशा आली. पदकाचे प्रबळ दावेदार असलेले सिंधू आणि गतविजेत्या सायना या दोघीही उपांत्यपुर्व फेरीत पराभूत झाल्याने भारताचे महिला गटातील आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू ताइ जु यिंगविरुद्ध पुन्हा एकदा सिंधूला पराभवाचे तोंड पहावे लागले. चीनी तैपईच्या या खेळाडूने तब्बल सातव्यांदा सिंधूला पराभवाचा धक्का दिला. सिंधूने पहिला गेम जिंकून आश्वासक सुरुवात केली. परंतु, यानंतर यिंगने सलग दोन गेम जिंकताना १०-२१, २२-२०, २१-१६ अशी बाजी मारली.
दुसऱ्या सामन्यात भारताच्या सायना नेहवालला गतउपविजेत्या सुन यू विरुध्द रोमांचक सामन्यात पराभूत व्हावे लागले. तीन गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सायनाला १७-२१, २१-१०, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)