श्रीनिवासन करणार बीसीसीआयचे प्रतिनिधित्व
By admin | Published: June 22, 2015 01:28 AM2015-06-22T01:28:30+5:302015-06-22T01:28:30+5:30
श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदापासून रोखण्यात आले असले तरी, या आठवड्यात बार्बाडोसमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत
दुबई : श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदापासून रोखण्यात आले असले तरी, या आठवड्यात बार्बाडोसमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत जगमोहन दालमिया यांच्या स्थानी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते सज्ज आहेत.
आयसीसी पत्रकानुसार २४ ते २६ जून या कालावधीत होणाऱ्या बैठकीत आयसीसीचे चेअरमन श्रीनिवासन यांच्या नावाचा उल्लेख बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून करण्यात आलेला आहे. श्रीनिवासन आयसीसीचे प्रमुख म्हणून बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. मार्चमध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणारे दालमिया या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व का करणार नाहीत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर सोमवारी होणाऱ्या मुख्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. वार्षिक कॉन्फरन्सचे यजमानपद वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड भूषवीत आहे. आयसीसीची वार्षिक बैठक प्रथमच वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. या बैठकीत आयसीसीच्या ५० पेक्षा अधिक सदस्यांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची आशा आहे. आयसीसीच्या अजेंडामध्ये आयसीसी मेमोरेंडम व आर्टिकल आॅफ असोसिएशनमध्ये बदल, आयसीसीच्या नव्या अध्यक्षांच्या पदग्रहणावर शिक्कामोर्तब, सर्बियाला आयसीसीचे असोसिएट सदस्यपद बहाल करणे, श्रीलंका क्रिकेट व अमेरिका क्रिकेट संघटनांच्या स्थितीबाबत माहिती, भ्रष्टाचार विरोधी व सुरक्षा समितीच्या चेअरमनचा अहवाल आणि २०१५ नंतर आयसीसीच्या रणनीतीवर चर्चा आदींचा समावेश आहे.