स्टेन वावरिंका, अँडी मरे उपांत्य फेरीत
By Admin | Published: June 2, 2016 02:08 AM2016-06-02T02:08:39+5:302016-06-02T02:08:39+5:30
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविचने बुधवारी येथे दहाव्यांदा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठतानाच दहा कोटी डॉलर बक्षीस
पॅरिस : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविचने बुधवारी येथे दहाव्यांदा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठतानाच दहा कोटी डॉलर बक्षीस रक्कम प्राप्त करणारा पहिला खेळाडू बनण्याचा बहुमान मिळवला. त्याचप्रमाणे महिला एकेरीत सेरेना विलियम्सने सहजपणे विजय मिळवीत अंतिम आठमध्ये प्रवेश मिळवला. दुसरीकडे स्टेन वावरिंका व अँडी मरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पुरुष एकेरीच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला़
सर्बियाच्या २९ वर्षीय जोकोविचने स्पेनच्या रॉबर्टो बातिस्ता आगूट याचा ३-६, ६-४, ६-१, ७-५, असा पराभव केला. तथापि, जोकोविचला अजूनही फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावता आले नाही. व्हीनस विल्यम्सला पराभवाला सामोरे जावे लागले. पुतिनसेवा हिने स्पेनच्या १२ व्या मानांकित कार्ला सुआरेज नवारो हिचा ७-५, ७-५ असा पराभव केला. व्हीनसला मात्र स्वीत्झर्लंडच्या टिमिया बासिन्स्की हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. आठव्या मानांकित टिमिया हिने हा सामना ६-२, ६-४ असा जिंकला. (वृत्तसंस्था)विद्यमान चॅम्पियन स्टॅन वावरिंका गेल्या ३१ वर्षांत उपांत्य फेरी गाठणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. पुरुष एकेरीत अँडी मरे यानेदेखील सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. वावरिंकाने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या अल्बर्ट रामोस विनोलस याचा ६-१, ६-१, ७-६ असा पराभव केला. याआधी जिमी कॉनर्स १९८५ मध्ये जेव्हा उपांत्य फेरीत पोहोचला तेव्हा त्याचे वय ३२ होते. वावरिंकाची गाठ ब्रिटिश खेळाडू अँडी मरे याच्याशी होईल. अँडी मरे याने नवव्या मानांकित रिचर्ड गास्केट याचा ५-७, ७-६, ६-0, ६-२ असा पराभव केला.सानिया मिश्र दुहेरीत अंतिम आठमध्ये
सानिया मिर्झाने मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सानिया मिर्झा आणि इवान डोडिग या जोडीने चुरशीच्या दुसऱ्या फेरीत एलाइज कोर्नेट आणि जोनाथन एसेरिक या फ्रान्सच्या जोडीचा ६-७, ६-४, १0-८ असा पराभव केला. भारताच्या लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस ही जोडीदेखील उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. सेरेनाने युक्रेनच्या इलिना स्वितलोना हिचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला. तिने ६२ मिनिटांत १८ व्या मानांकित खेळाडूचे आव्हान मोडीत काढले. सेरेनाची पुढील फेरीतील लढत कजाखस्तानच्या युयी पुतिनसेवा हिच्याशी होईल. पेस, बोपन्नाचे आव्हान संपुष्टात
भारताचा लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान बुधवारी येथे आपापल्या जोडीदारासह संपुष्टात आले. पेस आणि पोलंडच्या मार्सिन माटकोवस्की या १६ व्या मानांकित जोडीला अमेरिकेचे ब्रायन बंधू माईक-बॉब या पाचव्या मानांकित जोडीने ७-६, ६-३, असे पराभूत केले.