स्टार बॉक्सर विजेंदर सिंगचा पुढील प्रतिस्पर्धी निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 02:04 AM2021-03-13T02:04:21+5:302021-03-13T02:04:45+5:30
रशियाच्या अर्तयस लोपसनविरूद्ध लढणार
नवी दिल्ली : भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंग आपल्या आगामी लढतीसाठी सज्ज होत असून, तो आता रशियाच्या अर्तयश लोपसनविरूद्ध लढेल. कोरोनामुळे एक वर्षाहून अधिक काळ रिंगपासून दूर राहिल्यानंतर १९ मार्चला विजेंदर पुनरागमन करेल.
गोवा येथे एका कसिनो जहाजाच्या छतावर होणारी ही लढत सुपर मिडल-वेट (७६ किलो) गटात खेळविण्यात येईल. नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान लोपसनच्या नावाची घोषणा करण्यात आली. या लढतीसाठी विजेंदरने चांगलीच तयारी केली असून, राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेता जय भगवान याच्यासह तो सराव करत आहे. विजेंदरने सांगितले की, ‘मोठ्या कालावधीनंतर रिंगमध्ये उतरणे सोपे नव्हते आणि शारीरिक लय मिळवण्यासाठी थोडा वेळ लागला. मात्र, मागील दोन महिने माझ्यासाठी चांगले ठरले. जय भगवानने गुरुग्राममध्ये सरावादरम्यान माझी खूप मदत केली. यादरम्यान मी माझे ब्रिटिश प्रशिक्षक ली बियर्ड यांच्याशी ऑनलाईनद्वारे संपर्कातही होतो.’
कोण आहे रशियाचा अर्तयश लोपसन?
रशियाचा २६ वर्षीय अर्तयश लोपसन याने आतापर्यंत सहा व्यावसायिक लढती खेळल्या असून, यापैकी चार लढती त्याने जिंकल्या आहेत. या चार विजयांपैकी दोन विजय त्याने नॉकआऊटने जिंकल्या. डिसेंबर २०२० मध्ये लोपसनने आपला अखेरचा विजय मिळवला असून, त्यात त्याने युसूफ मागोमेदवेकोवला गुणांच्या अधारे नमवले होते.
विजेंदरचा तुफान फॉर्म!
nव्यावसायिक बॉक्सिंगमध्ये विजेंदर अद्याप अपराजित राहिला आहे. त्याने आतापर्यंत १२ लढती खेळताना सर्व लढती जिंकल्या असून, त्यापैकी ८ लढती नॉकआऊटने जिंकल्या हे विशेष.
nबीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलेल्या विजेंदरने आपल्या याआधीच्या लढतीत राष्ट्रकुल स्पर्धेचा माजी विजेता चार्ल्स एडामू याला दुबईत नमवले.