स्टार ‘राफा’चा उपांत्य फेरीत प्रवेश
By admin | Published: January 26, 2017 01:10 AM2017-01-26T01:10:18+5:302017-01-26T01:10:18+5:30
स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने आॅस्टे्रलियन ओपनच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करताना कॅनडाचा धोकादायक
मेलबर्न : स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने आॅस्टे्रलियन ओपनच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करताना कॅनडाचा धोकादायक प्रतिस्पर्धी मिलोस राओनिचचे कडवे आव्हान सरळ तीन सेटमध्ये संपवले. याच वेळी महिला गटात अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने आपला धडाका कायम राखताना जोहान कोंटाची विजयी घोडदौड रोखून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
१४ ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविलेला नदाल आपल्या अडीच वर्षांच्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने २ तास ४४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत राओनिकचे कडवे आव्हान ६-४, ७-६, ६-४ असे परतवले. वेगवान सर्व्हिससाठी ओळखल्या जाणाऱ्या राओनिकने अपेक्षेप्रमाणे नदालवर आक्रमक हल्ला केला खरा; परंतु नदालने आपल्या अनुभवाच्या जोरावर राओनिकला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविला.
उपांत्य फेरीत नदालसमोर बल्गेरियाच्या १५व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोवचे आव्हान असेल. दिमित्रोवविरुद्ध नदालने ८ सामने खेळले असून, त्यांपैकी ७ सामन्यांत नदालने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, यासह टेनिसप्रेमींची रॉजर फेडरर वि. नदाल असा ‘हायव्होल्टेज’ अंतिम सामना पाहण्याची आशा उंचावली आहे. त्याच वेळी, २०१४मध्ये फ्रेंच ओपन पटकावल्यानंतर पहिल्यांदाच कोणत्याही ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी झालेल्या लढतीत दिमित्रोवने दणदणीत विजय मिळवताना बेल्जियमच्या डेव्हीड गॉफीनचा ६-३, ६-२, ६-४ असा सहज धुव्वा उडवला.
दुसरीकडे, महिला गटात बलाढ्य सेरेनाने दमदार वाटचाल कायम राखली. सेरेनाने स्पर्धेत लक्षवेधी आगेकूच केलेल्या ब्रिटनच्या कोंटाला सहजपणे ६-२, ६-३ असे नमवले. यासह कोंटाची सलग ९ विजयी सामन्यांची मालिका संपुष्टात आली. या शानदार विजयासह दिग्गज माजी टेनिसपटू स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा विक्रम मागे टाकण्याची आशा सेरेनाने कायम राखली आहे. त्याचबरोबर अंतिम सामन्यात मोठी बहीण व्हीनससह खेळण्याची आशाही सेरेनाने कायम राखली आहे. दरम्यान, उपांत्य फेरीत सेरेनाला अनुभवी मिरजाना लुसिच बरोचीविरुद्ध दोन हात करावे लागेल.
लुसिचने दमदार विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश करताना पाचव्या मानांकित कॅरोलिना प्लिसकोवाला ६-४, ३-६, ६-४ असा धक्का दिला. (वृत्तसंस्था)
महिलांमध्ये दिग्गजांचे वर्चस्व
महिला गटात उपांत्य फेरी गाठलेल्यांपैकी केवळ अमेरिकेची २५ वर्षीय कोको वँडेवेगेचा अपवाद वगळला, तर उर्वरित तिन्ही प्रतिस्पर्धी खेळाडूंचे वय ३०हून अधिक आहे. यामध्ये सेरेना (३४), व्हीनस (३५) या विल्यम्स भगिनी आणि मिरजाना लुसिच बरोची (३४) यांचा समावेश आहे. यासह ओपन युगामध्ये पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या महिला गटात ३५ किंवा त्याहून अधिक वयाच्या दोन खेळाडूंनी उपांत्य फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे, लुसिचने आपल्या किशोर वयात जागतिक टेनिसमध्ये धमाकेदार पदार्पण केले होते. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे तिची कारकीर्द थांबली होती. यानंतर तिने शानदार पुनरागमन केले असून, तब्बल १८ वर्षांनंतर ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
सानिया मिर्झाची उपांत्य फेरीत धडक
मिश्र दुहेरी गटात भारताच्या सानिया मिर्झाने इवान डोडिगसह खेळताना भारताच्याच रोहन बोपन्ना आणि गॅब्रायला दाब्रोवस्की यांचा रोमांचक लढतीत पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सानिया-डोडिग यांनी झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना बोपन्ना-गॅब्रायल यांचा ६-४, ३-६, १२-१० असा पराभव केला. ६७ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात बोपन्ना-गॅब्रायल यांनी पुनरागमन करण्याच्या काही सोप्या संधी गमावल्या. यासह बोपन्नाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.