विनेश फोगाटचं रक्षाबंधन! लाडक्या भावानं दिलं 'भारी' गिफ्ट; मात्र कुस्तीपटूनं घेतली फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 04:02 PM2024-08-19T16:02:27+5:302024-08-19T16:10:47+5:30
raksha bandhan 2024 : सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
Vinesh Phogat Tied Rakhi to her Brother : आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्ण कामगिरीला मुकलेल्या विनेश फोगाटनेही आपल्या भावाला राखी बांधली. यावेळी तिच्या भावाने दिलेले गिफ्ट पाहून स्टार कुस्तीपटूने मिश्किल टिप्पणी करताना भावाची फिरकी घेतली. भारताची गोल्डन गर्ल म्हणून तमाम भारतीयांच्या मनात जागा मिळवणारी विनेश फोगाट शनिवारी मायदेशात परतली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अंतिम फेरी गाठूनही विनेश पदकाला मुकली. १०० ग्रॅम वजन वाढल्याने भारताच्या हक्काचे पदक गेले. अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले पण तिथेही विनेशच्या हाती निराशा पडली.
विनेश फोगाटने सोमवारी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. विनेशने भाऊ हरविंदर फोगाटला राखी बांधली. यावेळी तिच्या भावाने तिला एक खास भेट दिली, ज्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. आपल्या भावाने दिलेली भेट पाहून विनेशनेही स्मित केले. विनेश आणि तिच्या भावाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विनेश फोगाटने भेटवस्तूबद्दल एक मजेदार टिप्पणी केली. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, विनेश ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलसोबत दिसत आहे. यावर विनेश हसत म्हणते की, मी आता ३० वर्षांची आहे. मागच्या वर्षी देखील माझ्या भावाने मला ५०० रुपये दिले आणि यावेळीही तेवढीच रक्कम आहे. ही माझ्या भावाची संपूर्ण आयुष्याची कमाई आहे, असे विनेशने मिश्किलपणे म्हटले.
विनेश फोगाट को राखी बांधने पर मिला बंपर गिफ्ट pic.twitter.com/ZA7T9uZy3L
— Mohammad Wahid 🇮🇳 (@wahidlucknavi) August 19, 2024
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली.