स्टार्कची कामगिरी भारताविरुद्ध निर्णायक : मार्श
By admin | Published: March 22, 2015 01:17 AM2015-03-22T01:17:32+5:302015-03-22T01:17:32+5:30
एमसीजीवर गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची कामगिरी निर्णायक ठरेल,
सिडनी : एमसीजीवर गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची कामगिरी निर्णायक ठरेल, असे संकेत आॅस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर आणि संघाचे कोच जेफ मार्श यांनी दिले आहेत.
स्पर्धेतील सहा सामन्यांत १८ गडी बाद करणारा स्टार्क आॅस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.
मार्श म्हणाले, ‘‘दोन उत्कृष्ट प्रतिस्पर्धी समोरासमोर असल्याने ही लढत फारच रंगतदार होईल. भारताने सलग चांगली कामगिरी केली आहे, तर आॅस्ट्रेलिया संघातही एकाहून एक श्रेष्ठ खेळाडूंचा भरणा आहे. ही अटीतटीची लढत असेल. पण उपांत्य लढतीत विजयाचा प्रबळ दावेदार आॅस्ट्रेलिया असल्याचे माझे मत आहे. या सामन्यात मिशेल स्टार्कची कामगिरी निर्णायक ठरेल.’’
१९८७ च्या विश्वविजेत्या संघाचे खेळाडू आणि १९९९ च्या विजेत्या संघाचे कोच राहिलेले मार्श म्हणाले, ‘‘आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या भारताने कसोटी आणि वन डे मालिकेत दारुण कामगिरी केल्यानंतरही विश्वचषकात जी मुसंडी मारली त्यामुळे मी फार प्रभावित झालो आहे. मालिकेतील पराभवाची मरगळ झटकून भारताने नव्याने जी सुरुवात केली ती प्रशंसनीय म्हणावी लागेल. भारतीय संघ सध्या सामूहिक कामगिरी करीत आहे. (वृत्तसंस्था)