पुणे संघाची सावध सुरुवात
By Admin | Published: April 25, 2016 12:27 AM2016-04-25T00:27:53+5:302016-04-25T00:27:53+5:30
आयपीएल : अजिंक्य रहाणेचे अर्धशतक
आ पीएल : अजिंक्य रहाणेचे अर्धशतकपुणे : अजिंक्य रहाणेच्या आणखी एका शानदार खेळीच्या बळावर रायजिंग पुणे सुपर जायंटस् संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध सावध सुरुवात केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रायजिंग पुणे सुपर जायंटस् संघाने १५ षटकांत ३ बाद १00 धावा केल्या. जबरदस्त फॉर्मात असणारा अजिंक्य रहाणे ४२ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ५0 आणि ॲल्बी मॉर्कल २ धावांवर खेळत होते. कोलकाता नाईट रायडर्सकडून शकीब अल हसन याने १ गडी बाद केला.कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर याने नाणेफेक जिंकून महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील रायजिंग पुणे सुपर जायंटस् संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना पुणे संघाला आक्रमक फटके मारण्यापासून रोखले. त्यातच पुणे संघाची सुरुवात अपेक्षेनुरूप झाली नाही. डावाच्या चौथ्याच षटकात शकीब अल हसन याने फाफ ड्यू प्लेसिस (४) याला त्रिफळाबाद करीत कोलकाता नाईटर रायडर्स संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि स्टीव्हन स्मिथ यांनी ५0 चेंडूंत ५६ धावांची भागीदारी करताना पुणे संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला; परंतु चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जम बसलेला स्टीव्हन स्मिथ धावबाद झाला. धावबाद होण्यापूर्वी स्टीव्हन स्मिथ याने २८ चेंडूंत २ चौकारांसह ३१ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या थिसारा परेरा याने जोरदार सुरुवात करताना सतीशला उत्तुंग षटकार ठोकला; परंतु याच षटकात सतीशने परेराला त्रिफळाबाद करीत कोलकाता नाईट रायडर्सला तिसरे यश मिळवून दिले. बाद होण्यापूर्वी सतीशने ९ चेंडूंत १२ धावा केल्या.रायजिंग पुणे सुपर जायंटस् : १५ षटकांत ३ बाद १00. (रहाणे खेळत आहे ५0, स्टिव्हन स्मिथ ३१, थिसारा परेरा १२. शकीब अल हसन १/१४, सतीश १/२0)