एमसीए निवडणुकीला राजकीय रंग

By admin | Published: June 18, 2015 01:27 AM2015-06-18T01:27:50+5:302015-06-18T01:27:50+5:30

देशांतर्गत क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीची अटीतटीची लढत बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियम

State color for MCA elections | एमसीए निवडणुकीला राजकीय रंग

एमसीए निवडणुकीला राजकीय रंग

Next

रोहित नाईक,  मुंबई
देशांतर्गत क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीची अटीतटीची लढत बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियम परिसरात पार पडली. दरम्यान, या वेळी राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी या निवडणुकीसाठी उपस्थिती लावून निवडणूक रंगात आणली. १७ पदांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये एकूण ३२१ मतदारांनी मतदान केले.
दुपारी दीड वाजल्यापासूनच वानखेडे स्टेडियम परिसरात उमेदवार, त्यांच्या गटाचे कार्यकर्ते आणि एमसीए मतदार सदस्य यांची गर्दी झाली होती. शिवाय या निवडणुकीचे महत्त्व व क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची राहणारी उपस्थिती,
यामुळे वानखेडे स्टेडियमबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस - भाजपा विरुद्ध शिवसेना या राजकीय पक्षांच्या समावेशामुळे या निवडणुकीला राजकीय रंग चढला होता. पवार - म्हाडदळकर गटातून उपाध्यक्षपदासाठी उभे असलेले आमदार आशिष शेलार यांच्यासह आमदार राज पुरोहित यांचे आगमन झाले. यानंतर जितेंद्र आव्हाड, अध्यक्षपदाचे दावेदार शरद पवार, उपाध्यक्षपदाचे क्रिकेट फर्स्ट गटाचे दावेदार प्रताप सरनाईक, अचिन अहिर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारिणी सदस्यपदाचे क्रिकेट फर्स्टचे राहुल शेवाळे, भाई जगताप, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे, नितीन सरदेसाई, क्रीडामंत्री विनोद तावडे, क्षितिज ठाकूर आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी उपस्थिती दर्शवली.
त्याचवेळी विविध पदांसाठी निवडणूक लढवणाऱ्या माजी क्रिकेटपटूंसहित माजी आंतरराष्ट्रीय पंच माधव गोठोसकर, भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड, माजी क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांचीदेखील उपस्थिती होती.
दुपारी ३ ते संध्याकाळी ६.१५ पर्यंत सुरू असलेल्या या मतदानामध्ये पहिले मतदान करण्याचा मान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मिळवून विशेष ‘सलामी’ दिली. तर लाला लजपतराय कॉलेजचे प्रतिनिधी सुनील गुप्ता यांनी शेवटचे मतदान केले. एकूण ३२९ प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या निवडणुकीमध्ये ३२१ प्रतिनिधींनी मतदान केले. दरम्यान, माधव सावरगावकर (क्लब पायझर), सुनील खोब्रेकर (इंडो बर्मा) आणि रामा कुकीयन (नेव्हल डॉकयार्ड) यांना काही कारणांमुळे मतदान करता आले नाही. तर जयंत झवेरी (फोर्ट विजय क्लब) हे सध्या बीसीसीआयचे कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याने त्यांना नियमानुसार मतदान करता येत नसल्याने एकूण ४ प्रतिनिधी या वेळी बाद ठरले.
तसेच उरलेल्या ३२५ प्रतिनिधींपैकी ४ प्रतिनिधी हे अनुपस्थित राहिल्याने एकूण ३२१ जणांनी या वेळी मतदान केले. अनुपस्थित प्रतिनिधींमध्ये नारायण राणे (इलेव्हन ७७), दारा पोचखानवाला (फोर्ट यंगस्टार), सुनील नार्वेकर (एचडीएफसी) आणि जितेंद्र गाला (गुजराथी सेवा मंडळ) यांचा समावेश आहे.
एकूणच, २००१ सालानंतर प्रथमच एमसीएची निवडणूक चुरशीची झाली असल्याची चर्चा या वेळी रंगली होती. शिवाय विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांना थेट आव्हान दिलेल्या क्रिकेट फर्स्ट गटाला शिवसेना पक्षाने पाठिंबा दिल्याने यंदाच्या निवडणुकीचा निकाल काय लागेल यावर सगळीकडे चर्चा पाहण्यास मिळाली. साधारण साडेसहानंतर मतमोजणीला सुरुवात झाली.

ही निवडणूक अत्यंत वेगळी असून याकडे राजकीय दृष्टिकोन काहीच नाही. मी कधीच क्रिकेट राजकारणात समाविष्ट नव्हतो. या निवडणुकीद्वारे मुंबईला जुने दिवस पुन्हा प्राप्त होतील, अशी आशा करूया. खेळांच्या निवडणुकीमध्ये राजकीय व्यक्तींनी प्रवेश करू नये, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण राजकीय व्यक्तींच्या सहकार्यानेच खेळाचा विकास होऊ शकतो. त्याचबरोबर क्रिकेटमधील नवे टॅलेंट शोधण्यासाठी आंतरविद्यापीठीय क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू करणे जरुरी आहे. कारण या प्रकारच्या क्रिकेटने अनेक दर्जेदार क्रिकेटपटू देशाला मिळाले आहेत.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

राजकीय दृष्टिकोनातून नाही, तर मुंबई क्रिकेटच्या प्रगतीसाठी आम्ही डॉ. विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट गटाला पाठिंबा दिला आहे. मी एमसीए निवडणुकीदरम्यान अनेक मतदारांशी बोललो व त्यातून सर्वांनीच आता परिवर्तनाची गरज असल्याचे सांगितले. शिवाय यापूर्वी कधीही मजबूत प्रतिस्पर्धी किंवा गट एमसीए निवडणूक लढला नसल्याने मतदारांनी नाइलाजाने मतदान केले होते.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

यांची उपस्थिती... आमदार आशिष शेलार (दुपारी १:५८), माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (२:०६), डॉ. विजय पाटील आणि माजी क्रिकेटपटू अ‍ॅबी कुरविल्ला (२:२४), माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे (२:२६), जितेंद्र आव्हाड (२:२९), राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (२:३२), माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत (२:३५), सचिन अहिर (२:४२), भाई जगताप (३:२०), एकनाथ शिंदे (४:०५), माजी पंच माधव गोठोसकर (४:१२), शिवसेना नेते सुभाष देसाई (४:१९), शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे (४:२७), नितीन सरदेसाई (४:३५), क्रीडामंत्री विनोद तावडे (५:०५), क्षितिज ठाकूर (५:१३), रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले (५:३५) आणि प्रशिक्षक दिनेश लाड (५:३६)

Web Title: State color for MCA elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.