राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा : मुंबईचे बिरु बिंद, प्रथमेश नाडकर, मृणाल झारेकर अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 09:36 PM2019-02-28T21:36:49+5:302019-02-28T21:37:02+5:30
नागपूरच्या अनिल तूरकरने मुंबईच्या राहुल भारद्वाजचा ३-० असा पराभव केला व अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुंबई : शिवशंकर उत्सव मंडळाने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन व मुंबई जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने ५ वी राज्यस्तरीय पुरुष प्रेसिडेंट चषक बॉक्सिंग स्पर्धा गिरणगावात आयोजित केली आहे. या बॉक्सिंग स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने पार पडले. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ४९ किलो वजनी गटात नाशिकच्या गोपाळ खंदारेने लातूरच्या अरविंद सावंतचा व नागपूरच्या अनिल तूरकरने मुंबईच्या राहुल भारद्वाजचा ३-० असा पराभव केला व अंतिम फेरीत प्रवेश केला.
५२ किलो वजनी गटात पुण्याच्या गौरव गोसावीने कोल्हापूरच्या अनिकेत पोवरचा तर अमरावतीच्या वैभव शिंदेने नागपूरच्या नितेश पटलेचा (३-०) पराभव केला व अंतिम फेरीत प्रवेश केला. ५६ किलो वजनी गटात मुंबईच्या बिरु बिंदने पुण्याच्या आशीष रसाळचा तर कोल्हापूरच्या शुभम पवार अमरावतीच्या अजर अलीचा पराभव केला व अंतिम फेरीत प्रवेश केला.
६० किलो वजनी गटात पुण्याच्या आकाश मानेरेने नाशिकच्या श्रीहरी मोरेचा व अमरावतीच्या रीतीक तिवारीने मुंबईच्या अमित मानेला (३-०) पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ६४ किलो वजनी गटात औरंगाबादच्या अमेय कांबळेने नागपूरच्या अजय जुगसणीयेचा व पुण्याच्या ऋषिकेश रणदिवेने अमरावतीच्या युनूस सय्यदचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
६९ किलो वजनी गटात पुण्याच्या केतन गायकवाडने कोल्हापूरच्या मयूर सांगळेवर विजय मिळवला व दुसर्या सामन्यात औरंगाबादचा कुणाल भांगे विजयी ठरला. ७५ किलो वजनी गटात लातूरच्या लक्ष्मीकांत हातकरने अमरावतीच्या रोहण शिंदेवर (२-१) व मुंबईच्या प्रथमेश शिंदेने पुण्याच्या अनिकेत शिंदेवर सहज विजय संपादन केला.
८१ किलो वजनी गटात मुंबईच्या मृणाल झारेकरने नाशिकच्या परेश वाणीवर व पुण्याच्या अशपाक मुलांनीवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. ९१ किलो वजनी गटात पुण्याच्या सूरज विधातेने अमरावतीच्या समीर अहमदवर व औरंगाबादच्या शिव गाडेकरने मुंबईच्या सूरज यादवचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ९१ किलो वरील वजनी गटात अमरावतीच्या हृतिक ढोरेने मुंबईच्या तौसिफ शेखचा व पुण्याच्या अजय पवारने नाशिकच्या आनंद पटेकरचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.