राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा: निलांश, अमिन व प्रथम अजिंक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 05:31 PM2019-11-28T17:31:24+5:302019-11-28T17:32:59+5:30
निलांश चिपळूणकरने मुंबईच्याच मिहीर शेखचा ४-२५, २५-४, २५-८ असा पराभव करून विजेतेपदावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले.
मुंबई : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या विद्यमाने आयोजित मानाची व प्रतिष्ठेची राज्यस्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धेच्या मुले ऐकरीच्या विविध तीन गटांतील (१४, १७ व १९ वर्षाखालील मुले) विजेते अनुक्रमे मुंबईचा निलांश चिपळूणकर, अमिन अख्तर अहमद व प्रथम करिहार (नागपूर) यांनी विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा जिल्हा क्रिडा संकुल, पॅवेलियन इमारत, सांगली-मिरज रोड, सांगली येथे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने खेळविण्यात आली. या स्पर्धेला मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे व यजमान कोल्हापूर विभागातील विविध जिल्हयातून २०० खेळाडू, मुले व पंच यांच्या उत्स्फूर्त सहभाग लाभला.
मुले एकेरीच्या १४ वर्षाखालील गटाच्या अंतीम फेरीच्या तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबईच्या वनिता विश्राम हायस्कूल खेतवाडीचा विद्यार्थी निलांश चिपळूणकरने मुंबईच्याच मिहीर शेखचा ४-२५, २५-४, २५-८ असा पराभव करून विजेतेपदावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले. मुंबईच्या मिहीर शेखने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत पाच बोर्डात २५-४ अशी निलांश चिपळूणकरवर मात करत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये निलांशने शांतचित्ताने आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करत ६ बोर्डात २५-४ असा जिंकून १-१ ने बरोबरी केली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये निलांशने ४ बोर्डापर्यंत १२-८ अशी आघाडी घेतली. नंतरचे दोन बोर्ड ८ आणि ५ गुण घेऊन २५-८ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरून वर्चस्व सिद्ध केले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वनिता विश्राम हायस्कूल, खेतवाडीचा विद्यार्थी निलांश चिपळूणकरने नाशिकच्या आयान पिरजादेचा सरळ दोन गेममध्ये एकतर्फी विजय मिळवित २५-१, २५-११ असा धुव्वा उडवित अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या मिहीर शेखने अमरावतीच्या सुरज गायकवाडचा तीन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत १०-२५, २५-११, २५-२२ असे जिंकून अंतीम फेरीत प्रवेश मिळविला.
मुले एकेरीच्या १७ वर्षाखालील गटाच्या अंतीम फेरीच्या दाने गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत नागपूरच्या अमीन अख्तर अहमदने मुंबईच्या निरज कांबळेचा २५-१२, २५-७ असा सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरून वर्चस्व सिद्ध केले.
मुले एकेरीच्या १९ वर्षाखालील गटाच्या अंतीम फेरीच्या सामन्यात नागपूरच्या प्रथम करिहारने दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबईच्या जयेश जाधवचा २५-१९, २५-२० असा संघर्षपूर्ण विजय मिळवून विजेतेपदाला गवसणी घातली.
धर्म पुरी, तामिलनाडू या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये १४, १७ व १९ वर्षाखालील मुले महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत :
१४ वर्षाखालील मुले : १) निलांश चिपळूणकर (मुंबई), २) मिहीर शेख (मुंबई), ३) सूरज गायकवाड (अमरावती), ४) अयान पिरजादे (नाशिक), ५) सार्थ मोरे (मुंबई), ६) याशिन अख्तर (नागपूर)
१७ वर्षाखालील मुले : १) अमीन अख्तर अहमद (नागपूर), २) निरज कांबळे (मुंबई), ३) प्रमोद वैद्य (पुणे), ४) सार्थक नागावकर (मुंबई), ५) ओजस जाधव (मुंबई), ६) श्रीकांत निखारे (नागपूर)
१९ वर्षाखालील मुले : १) प्रथम करिहार (नागपूर), २) जयेश जाधव (मुंबई), ३) अदनाम शेख (पुणे), ४) शुभम मोरकर (नागपूर), ५) गौरिश रोडेकर (मुंबई), ६) तपन देशमुख (कोल्हापूर).