राज्यस्तरीय कबड्डी : जय भारत क्रीडा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स क्लब थेट उपउपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 01:52 PM2020-01-06T13:52:09+5:302020-01-06T13:52:53+5:30

मुंबई उपनगरच्या केदारनाथ क्रीडा मंडळाने पुण्याच्या महाराष्ट्र कबड्डी संघाला २२-२१ असे चकित करीत उपउपांत्य फेरी गाठली.

State Level Kabaddi: Jai Bharat Sports mandal, Ankur Sports Club in quarter final | राज्यस्तरीय कबड्डी : जय भारत क्रीडा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स क्लब थेट उपउपांत्य फेरीत

राज्यस्तरीय कबड्डी : जय भारत क्रीडा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स क्लब थेट उपउपांत्य फेरीत

googlenewsNext

मुंबई :   केदारनाथ क्रीडा मंडळ, विजय बजरंग व्यायाम शाळा यांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या “शतक महोत्सवी वर्षानिमित्त” आयोजित “चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” उपउपांत्य फेरी गाठली. तर जय भारत क्रीडा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स क्लब यांनी आपापल्या साखळी गटात अग्रस्थान पटकावित थेट उपउपांत्य फेरीत धडक दिली.

लालबाग-मुंबई येथील सदगुरु भालचंद्र महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या पहिल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या केदारनाथ क्रीडा मंडळाने पुण्याच्या महाराष्ट्रकबड्डी संघाला २२-२१ असे चकित करीत उपउपांत्य फेरी गाठली. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळला गेला. मध्यांतरात ०८-११ अशा ३गुणांनी पिछाडीवर पडलेल्या केदारनाथने नंतर मात्र जोरदार कमबॅक करीत हा विजय खेचून आणला. ओमकार व निखिल या कदम बंधूंच्या धडाकेबाज चढाया त्याला प्रकाश मोरे, विपुल चव्हाण यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ या मुळे हा अशक्यप्राय वाटणारा विजय केदारनाथने शक्य करून दाखविला.  चेतन थोरात, अभि साळवे, प्रसाद नखाते, अमोल नखाते यांचा चढाई-पकडीचा उत्कृष्ट खेळ महाराष्ट्र संघाचा पराभव टाळण्यासाठी किंचितसा कमी पडला.

 

  दुसऱ्या उपउपांत्यपूर्व सामन्यात मुंबई शहरच्या दोन संघात झाला. त्यात विजय बजरंग व्यायाम शाळेने अमर क्रीडा मंडळाला २८-२६ असा पराभव करीत आगेकूच केली. अमन साळवी याच्या चढाया त्याला संकेत सावंत, नितीन विचारे यांनी दिलेली भकम पकडीची साथ त्यामुळे अमरने १ लोण देत विश्रांतीला १७-०७ अशी १० गुणांची मोठी आघाडी घेतली होती. पण या आघाडीचा बचाव त्यांना करता आला नाही. विश्रांतीनंतर गणेश तुपे, आकाश निकम यांनी झंजावाती चढाया करीत भराभर गुण टिपत, तर गणेश हातकर, जितेंद्र कुंडे यांनी केलेल्या धाडशी पकडीमुळे विजय बजरंगने अमरवर दोन लोण देत हा सामना आपल्याकडे खेचून आणला. या दोन संघा बरोबरच अ गटातून जय भारत क्रीडा मंडळ आणि ब गटातून अंकुर स्पोर्ट्स क्लब यांनी थेट उपउपांत्य फेरी गाठली.

  या अगोदर झालेल्या साखळी सामन्यात दोन गटात अत्यंत चुरस होती. ग गटात शिवशक्तीसाठी करो या मरो ची परिस्थिती होती, तर इ गटात बंड्या मारुती आणि विजय नवनाथ या दोघांना विजय आवश्यक होता. ग गटात शिवशक्तीने गोलफादेवीला २५-२४ असे चकवीत गुण फरकाच्या आधारावर दोघांनी देखील बाद फेरी गाठली.  कारण या गटात तीन संघाचे समान साखळी गुण झाले. त्यात गोलफादेवी अधिक १, शिवशक्ती अधिक;वजा ०, तर जय बजरंग वजा -१ अशी गन सरासरी आली. रायगडचा जय बजरंग संघ या गटात बाद झाला.  इ गटात देखील अशीच परिस्थिती होती. कारण या गटातून केदारनाथ संघाने अगोदरच बाद फेरी गाठली होती. त्यामुळे बंड्या मारुती आणि विजय नवनाथ या दोन संघात जो  अधिक गुण फरकाने या गटात विजेता ठरेल तो संघ बाद फेरी गाठू शकणार होता. त्यात अखेर बंड्या मारुतीने विजय नवनाथला ३५- २६ असे पराभूत करीत बाद फेरीचा आपला मार्ग खुला केला. निलेश लाड जितेश सापते या विजयाचे शिल्पकार ठरले. विजय नवनाथकडून हर्ष लाड, मयूर खामकर छान खेळले.

Web Title: State Level Kabaddi: Jai Bharat Sports mandal, Ankur Sports Club in quarter final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.