राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा - २०१८: पुरुषांमध्ये महाराष्ट्र पोलीस आणि महिलांमध्ये स्वराज्य संघा उपांत्य फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 07:13 PM2018-03-25T19:13:02+5:302018-03-25T19:13:02+5:30
एअर इंडिया वि भारत पेट्रोलियम, महिंद्रा वि. महाराष्ट्र पोलीस अशा व्यावसायिक पुरुषांत, तर स्वराज्य वि संघर्ष, महात्मा गांधी वि शिव ओम् अशा महिलांत उपांत्य लढती होतील.
मुंबई : बाल उत्कर्ष क्रीडा मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया, भारत पेट्रोलियम, महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस यांनी पुरुषांत, तर स्वराज्य, संघर्ष, महात्मा गांधी, शिव ओम् यांनी महिलांत उपांत्य फेरी गाठली. एअर इंडिया वि भारत पेट्रोलियम, महिंद्रा वि. महाराष्ट्र पोलीस अशा व्यावसायिक पुरुषांत, तर स्वराज्य वि संघर्ष, महात्मा गांधी वि शिव ओम् अशा महिलांत उपांत्य लढती होतील.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. आणि मुं. शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने मुंबईतील लालबाग येथील गणेश गल्ली मैदानावर सुरू असलेल्या पुरुषांच्या उपांत्य पूर्व सामन्यात एअर इंडियाने युनियन बँकेचा ३९-१४असा सहज पाडाव केला. सुनील दुबले, उमेश म्हात्रे, दिपककुमार यांच्या झंजावाती खेळाने मध्यांतराला २०-०९अशी आघाडी घेणाऱ्या एअर इंडियाने उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय सोपा केला. बँकेचे आकाश निकम, अजय देवाडे बरे खेळले.
दुसऱ्या सामन्यात भारत पेट्रोलियमने मुंबई बंदरचा २६-१९असा पराभव करीत नुकत्याच मुं. महापौर स्पर्धेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला. सुरुवातीपासून सावध खेळ करीत मध्यांतराला १०-०९अशी आघाडी घेणाऱ्या पेट्रोलियमने उत्तरार्धात देखील सावध पवित्रा घेतला. काशिलिंग आडके, आकाश पिकलमुंडे यांच्या चढाया आणि निलेश शिंदे, नितीन मोरे यांच्या पकडीच्या खेळाला याचे श्रेय जाते. शुभम कुंभार,आदित्य शिंदे, मनोज बेंद्रे यांच्या खेळाने बंदर संघाला आघाडी मिळवून दिली होती, पण अति आत्मविश्वास त्यांना नडला. महिंद्राने मुंबई महानगर पालिकेचा प्रतिकार ३६-२३असा संपविला. मध्यांतराला १७-१२अशी आघाडी महिंद्राकडे होती. अजिंक्य पवार,शेखर तटकरे, स्वप्नील शिंदे महिंद्राकडून, तर आकाश कदम, राहुल खाटीक, सुनील मोकलं पालिकेकडून उत्कृष्ट खेळले. महाराष्ट्र पोलीसने देना बँकेचे आव्हान ३४-२७ असे मोडून काढत उपांत्य फेरी गाठली. अतिशय संथ व सावधपणे खेळल्या गेलेल्या या सामन्यात विश्रांतीला १८-१४ अशी आघाडी पोलीस संघाकडे होती. महेंद्र रजपूत, सुलतान डांगे यांच्या धारदार चढाया त्याला बाजीराव होडगे,विपुल मोकलं यांची मिळालेली भक्कम पकडीची साथ यामुळे पोलिसांनी हा विजय साकारला. देना बँकेकडून पंकज मोहिते, सुदेश खुळे, संकेत सावंत यांनी कडवी लढत दिली.
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात उपनगरच्या स्वराज्यने बलाढ्य शिवशक्तीला २१-२०असे चकवित उपांत्य फेरी गाठली. मध्यांतराला ०७-१३अशा ६गुणांनी पिछाडीवर पडलेल्या स्वराज्यने नंतर मात्र जोरदार खेळ केला.उत्तरार्धात स्मिता पांचाळ, राणी उपहार यांनी धारदार चढाया करीत, तर श्रुतिका घाडीगावकर, शर्वरी गोडसे यांनी धाडसी पकडी करीत स्वराज्यकडे हा विजय खेचून आणला. प्रतीक्षा तांडेल, ऋणाली भुवड, रक्षा नारकर यांचा खेळ उत्तरार्धात ढेपाळला.त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. उपनगरच्या संघर्षने मुं. पोलिसांचे आव्हान २८-२०असे संपविले. मध्यांतराला १५-११अशी आघाडी संघर्षकडे होती. कोमल देवकर, कोमल यादव, प्रणाली नागदेवते यांनी संघर्षकडून तर भक्ती इंदुलकर, शीतल शिंदे, सोनाली धुमाळ यांनी पोलिसांकडून उत्कृष्ट खेळ केला. शिवशक्ती आणि पोलीस यांच्या पराभवाने मुंबईच्या संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
उपनगरच्या महात्मा गांधीने पुण्याच्या एम एस स्पोर्ट्सचा ५०-१५असा धुव्वा उडविला. पूजा किणी, प्रतीक्षा मांडवकर, तृप्ती सोनावणे यांच्या तुफानी खेळाला पुण्याकडे उत्तर नव्हते. मध्यांतराला ३२-०६अशी मोठी आघाडी घेत पुण्याच्या गोठातील हवाच काढून घेतली होती. पुण्याच्या आरती मोरे,अक्षता मुसळे यांचा प्रतिकार अगदीच दुबळा होता. पुण्याच्या शिव ओम् ने पालघरच्या कुर्लाईचा चुरशीच्या लढतीत ३२-२८ असा पाडाव केला. स्नेहा साळुंखे, लीना जमदाडे, रविना वारोसे यांच्या दमदार खेळाने १७-१२अशी आघाडी घेणाऱ्या पुणेकरांना उत्तरार्धात कडव्या लढतीला सामोरे जावे लागले. कुर्लाई च्या पूजा पाटील, प्रतीक्षा पाटील, शाहीन शेख यांची लढत कौतुकास्पद होती.