राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : गोलफादेवी ठरले "उजाला चषकाचे" मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 08:20 PM2019-02-04T20:20:41+5:302019-02-04T20:21:13+5:30
सिद्धेश पिंगळे स्पर्धेत सर्वोत्तम
मुंबई : मुंबई शहरच्या गोलफादेवी संघाने बंड्या मारुतीचा ३४-२९असा पराभव करीत रोख रु.५१,०००/- व "उजाला चषक" आपल्या नावे केले. उपविजेत्या बंड्या मारुतीला रोख रु.३५,००/- व चषकावर समाधान मानावे लागले. गोलफादेवीचा सिद्धेश पिंगळे ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू. त्याला " मोटरबाईक" देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व ठाणे जिल्हा कबड्डी असो. यांच्या मान्यतेने उजाला क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील हा अंतिम सामना मुंबईतील या दोन संघात रंगला.
पहिला गुण घेत गोलफादेवीने सुरुवात झोकात केली. पहिला लोण देत त्यांनी विजयाच्या दिशेने मुसंडी मारली.मध्यांतराला गोलफादेवीने २०-१० आघाडी घेत सामन्यावरील आपली पकड अधिक भक्कम केली. मध्यांतरानंतर बंड्या मारुतीच्या विनोद अत्याळकर व शुभम चौगुले यांनी आपल्या खेळाची गती वाढवीत सामन्यात रंगत आणली. काही झटापटीच्या क्षणामुळे सामन्यातील चुरस वाढली. पण वेळीच सावरत गोलफादेवीने विजय आपल्या हातून निसटू दिला नाही. सिद्धेश पिंगळे, तुषार दुडिया यांच्या चतुरस्त्र खेळाला गोलफादेवीच्या विजयाचे श्रेय जाते.
बंड्या मारुतीचा विनोद अत्याळकर आणि गोलफादेवीचा तुषार दुडिया यांना स्पर्धेतील अनुक्रमे चढाई आणि पकडीचे सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. दोघांना प्रत्येकी सायकल देऊन गौरविण्यात आले. या अगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गोलफादेवीने जय शिवचा ३८-१७ असा, तर बंड्या मारुतीने श्रीरामचा ४१-१७ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. या उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी रोख रु.१५,०००/- व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार कपिल पाटील, भिवंडी पूर्वचे आमदार रुपेश म्हात्रे, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, जिल्हापरिषद सदस्य जयंत पाटील, भाजपाचे देवेश पाटील, स्पर्धा निरिक्षक शशिकांत राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला.