राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुंबई उपनगरचे ऐतिहासिक जेतेपद, महिलांमध्ये ठाणेकरांनी मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 03:29 AM2017-10-20T03:29:32+5:302017-10-20T03:30:04+5:30
मुंबई उपनगर संघाने राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद पटकावताना पुरुष गटात पहिल्यांदाच बाजी मारली.
मुंबई : मुंबई उपनगर संघाने राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद पटकावताना पुरुष गटात पहिल्यांदाच बाजी मारली. त्याचवेळी, महिलांमध्ये ठाणे संघाने वर्चस्व राखले. मुंबई उपनगरने चमकदार कामगिरी करताना तगड्या पुणे संघाला, तर ठाण्याने रत्नागिरीला पराभूत करत बाजी मारली.
महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने वरळी स्पोटर््स क्लबच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या पुरुष अंतिम संघात मुंबई उपनगरने बलाढ्य पुण्याचा १४-१३ असा २० सेकंद व १ गुणाने थरारक पाडाव केला. ॠषिकेश मुर्चावडे आणि अनिकेत पोटे यांनी अप्रतिम अष्टपैलू खेळ करताना उपनगरचा विजय साकारला. त्याचप्रमाणे, अक्षय भांगरे, हर्षद हातणकर व सागर घाग यांनी शानदार बचाव करत पुणेकरांना घाम गाळायला लावले. पुण्याकडून प्रतीक वाईकर, सुयश गरगटे, अक्षय गणपुले आणि वैभव पाटील यांनी अपयशी झुंज दिली.
महिलांमध्ये गतविजेत्या ठाण्याने आपले जेतेपद कायम राखताना रत्नागिरीचे आव्हान ७-५ (३-३, ४-२) असे परतावले. पहिल्या सत्रात बरोबरी राहिल्यानंतर, दुसºया सत्रात आक्रमक पवित्रा घेतलेल्या ठाण्याने दोन गुणांची आघाडी निर्णायक ठरवली.
प्रीयांका भोपी, कविता घाणेकर यांनी अष्टपैलू खेळी करत ठाण्याचे जेतेपद कायम राखण्यात मोलाचे योगदान दिले. तसेच प्रणाली मगरचे संरक्षण आणि दीक्षा सोनसूरकरचे आक्रमणही महत्त्वाचे ठरले. रत्नागिरीकडून ऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतार व आरती कांबळे यांनी छाप पाडली.
स्पर्धेतील वैयक्तिक विजेते
सर्वोत्कृष्ट खेळाडू
पुरुष : ॠषिकेश मुर्चावडे (मुं. उपनगर)
महिला : प्रीयांका भोपी (ठाणे)
सर्वोत्कृष्ट संरक्षक
पुरुष : अक्षय भांगरे (मुं. उपनगर)
महिला : ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी)
सर्वोत्कृष्ट आक्रमक
पुरुष : प्रतीक
वाईकर (पुणे)
महिला : प्रणाली
मगर (ठाणे)