राज्यस्तरीय खो खो : रा. फ. नाईक, शिवभक्त, छत्रपती, आर्यन-रत्नागिरी उपांत्यफेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 03:15 PM2019-02-27T15:15:26+5:302019-02-27T15:15:50+5:30
महिला राज्यस्तरीय स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत ठाण्याच्या रा. फ. नाईक विद्यालय या संघाने विजय मिळवला.
मुंबई : महिला राज्यस्तरीय स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत ठाण्याच्या रा. फ. नाईक विद्यालय या संघाने साखरवाडी क्रीडा मंडळ सातारा या संघाचा १७-०५ असा बारा गुणाने पराभव केला. रा. फ. नाईक कडून खेळताना रुपाली बडेने १:५०, ३:१० मिनिटे संरक्षण करताना दोन खेळाडू मिळवले. पौर्णिमा सकपाळने ३:१० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात तीन गडी मिळवले, तर साक्षी तोरणे व पूजा फरगडे यांनी आक्रमणात प्रत्येकी तीन खेळाडू बाद केले. साखरवाडी क्रीडा मंडळच्या प्रांजल माडकरने २:५०, ३:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद केला मुस्कान नगारजी हिने १:०० , १:२० मिनिटे संरक्षण करत चांगली साथ दिली.
शिवभक्त विद्यालय, ठाणे या संघाने नरसिंह क्रीडा मंडळ पुणे या संघाचा १०-०८ असा एक डाव व दोन गुणांनी पराभव केला. शिवभक्त विद्यालय, ठाण्याच्या किशोरी मोकाशीने २:००, २:२० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक खेळाडू बाद केला व प्रियांका भोपीने नाबाद ३:३० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन खेळाडू बाद केले, तर कविता घाणेकरने ३:३० मिनिटे संरक्षण केले. नरसिंह क्रीडा मंडळतर्फे श्वेता वाघ नाबाद १:२० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात तीन खेळाडू बाद केले. प्रांजल जाधवने १:३० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक खेळाडू बाद करत चांगली लढत दिली.
छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ उस्मानाबाद संघाने श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर या संघाचा ११-०६ असा एक डाव व पाच गुणांनी राखून पराभव केला. उस्मानाबाद कडून खेळताना निकिता पवारने २:३०, १:३० मिनिटे नाबाद संरक्षण करत आक्रमणात चार खेळाडू बाद केले व जान्हवी पेठेने ४:०० संरक्षण केले. स्नेहा गोडसेने आक्रमणात दोन खेळाडू बाद केले, तर श्री समर्थकडून भक्ती धांगडेने १:२० , १:२० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात तीन खेळाडू बाद केले. साजल पाटीलने २:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात एक खेळाडू बाद केले.
रत्नागिरीच्या आर्यन स्पोर्ट्स क्लबने परांजपे स्पोर्ट्स क्लब या संघाचा ०९-०५ असा एक डाव व चार गुणाने पराभव केला. आर्यन स्पोर्ट्स क्लबकडून तन्वी कांबळेने ३:२० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात एक खेळाडू बाद केला. ऐश्वर्या सावंतने ५:४० मिनिटे संरक्षण केले. सोनिया भोसलेने आक्रमणात पाच खेळाडू बाद केले. परांजपे स्पोर्ट्स क्लबकडून श्रुती सकपाळने १:२० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात तीन खेळाडू मिळवले. आरती कदमने १:२० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात दोन खेळाडू बाद चांगला खेळ केला.
व्यावसायिक स्पर्धेत विदयुत महावितरण कंपनी या संघाने चिट चॅट कम्युनिकेशन या संघाचा २०-१ असा दहा गुणाने पराभव केला. विदयुत महावितरण कंपनीकडून प्रतीक वाईकरने २:२०, २:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन गडी बाद केले. तर गजानन शेंगाळने २:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात तीन गडी मिळवले, तर नरेश सावंतने २:३० नाबाद , १:१० आक्रमणात एक गडी मिळवले.