राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा : विजय क्लब, जय भारत उपांत्य फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 03:28 PM2019-04-14T15:28:23+5:302019-04-14T15:28:34+5:30
विजय क्लब,स्वस्तिक क्रीडा मंडळ, जय भारत क्रीडा मंडळ,शिवशंकर सेवा मंडळ यांनी बंड्या मारुती क्रीडा मंडळ आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली
मुंबई : विजय क्लब,स्वस्तिक क्रीडा मंडळ, जय भारत क्रीडा मंडळ,शिवशंकर सेवा मंडळ यांनी बंड्या मारुती क्रीडा मंडळ आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. विजय क्लब विरुद्ध स्वस्तिक आणि जय भारत विरुद्ध शिवशंकर अशा उपांत्य लढती होतील.त्या नंतर अंतिम लढत होईल. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.आणि मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने ना. म. जोशी मार्ग येथील ललित क्रीडा केंद्राच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एक सामना वगळता अन्य सामने तसे एकतर्फी झाले.
पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात विजय क्लबने अंकुर स्पोर्ट्सचा ३७-२४असा सहज पाडाव केला.अमित चव्हाण,झैद कवठेकर यांच्या झंजावाती चढाया त्याला श्री भारती,अभिषेक रामाणे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे विजय क्लबने मध्यांतराला २१-०६अशी भक्कम आघाडी घेतली होती.उत्तरार्धात यंदाचा हंगाम गाजविणाऱ्या अंकुरच्या सुशांत साईलला सूर सापडला, पण तो पर्यंत सामना हातून निसटला होता. अभिषेक दोरुगडे, मिलिंद कोलतेची त्याला बऱ्यापैकी साथ मिळाली,पण विजय काय त्यांना मिळाला नाही.
दुसऱ्या सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळाने गुड मॉर्निग स्पॉट्सवर ३९-२०अशी मात केली.पहिल्या डावात १७-०७अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या स्वस्तिकने दुसऱ्या डावात मात्र सावध खेळ करीत आपला उपांत्य फेरीतील प्रवेश निश्र्चित केला.सुयोग राजापकर, सिद्धेश पांचाळ यांच्या आक्रमक चढाया आणि अभिषेक चव्हाण,अक्षय बर्डे यांचा बचाव स्वस्तिकच्या विजयात महत्वपूर्ण ठरला.योगेश्वर खोपडे, सुदेश कुळे यांनी छान लढत दिली.
जय भारत क्रीडा मंडळाने उजाला क्रीडा मंडळाला ३४-२६असे रोखत उपांत्य फेरीत धडक दिली.अभिजित होडे, सागर काविलकर, ओमकार मोरे यांच्या चतुरस्त्र खेळाने जय भारताने विश्रांतीपर्यंत १९-०९अशी आघाडी घेत आपले वर्चश्व राखले होते.उत्तरार्धात मात्र उजालाच्या अक्षय भोईर,सुमित पाटील यांनी चढाईत गडी टिपत जय भारतच्या गोटात खळबळ उडवून दिली.त्यांना तहा शेख याने उत्तम पकडी करीत छान साथ दिली. शेवटी पहिल्या डावात घेतलेली आघाडी जय भारतच्या कामी आली.
शेवटचा सामना अत्यंत चुरशीनें खेळला गेला.यात शिवशंकर सेवा मंडळाने सत्यम क्रीडा मंडळाचे कडवे आव्हान ४३-३०असे संपुष्टात आणले.निलेश साळुंखे,गणेश जाधव यांचा धारदार चढाया, तर तुषार भोईर, सूरज बनसोडे यांच्या आक्रमक पकडीच्या जोरावर शिवशंकरने मध्यांतराला २४-१४अशी आश्वासक आघाडी घेतली होती.नितीन देशमुख, राज चव्हाण,अनिकेत म्हात्रे यांचा खेळ सत्यम संघाला विजयी करण्यात कमी पडला.त्यातच नितीन देशमुखचे चढाईतील अपयश सत्यमला पराभवाच्या गर्तेत घेऊन गेले.
या अगोदर झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचा निकाल खालील प्रमाणे.
१)अंकुर स्पोर्ट्स वि वि अमरहिंद मंडळ (४६-१४); २)जय भारत मंडळ वि वि श्री मावळी मंडळ(४६-१६); ३)उजाळा मंडळ वि वि गोलफादेवी मंडळ (३४-२९); ४)सत्यम मंडळ वि वि ओम् कबड्डी (५०-१६); ५)गुड मॉर्निग स्पोर्ट्स वि वि छत्रपती शिवाजी मंडळ (४३-३१); ६)स्वस्तिक मंडळ वि वि अमर मंडळ (३३-०८).